‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.
”ते सज्जन व्यक्ती आणि देशभक्त आहे,” अशा शब्दात चंद्राबाबू नायडू यांनी राधाकृष्णन यांची प्रशंसाही केली.
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी तेलुगू देसमचे केंद्रातील मंत्री के. राममोहन नायडू त्याचप्रमाणे पक्षाचे लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारही त्यांच्या सोबत होते. तर भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे हेदेखील यावेळी उपस्थित होते. २० मिनिटे ही भेट चालली.
पाठिंब्याबाबत शंका का?
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. ते तेलुगू भाषिक असल्याने तेलुगू अस्मितेच्या मुद्द्यावरून तेलुगू देसमचा पाठिंबा त्यांना मिळू शकतो, अशी अपेक्षा विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यपाल राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या पाठिंब्याबद्दल शंका का उपस्थित केली जात आहे, असा सवाल केला.
”मी निवडणुकीच्या आधीपासून ‘एनडीए’मध्ये आहे. केंद्रात आणि आंध्र प्रदेशातही ‘एनडीए’ची सत्ता आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचा पाठिंबा सी. पी राधाकृष्ण यांनाच असेल. सी. पी. राधाकृष्णन हे सज्जन व्यक्ती आहेत. ते अतिशय देशभक्त असून आपल्या देशाचा सन्मान वाढवतील,” असेही चंद्राबाबू नायडू म्हणाले.