उमरखेड येथे नैसर्गिक व कृत्रिम आपत्ती निवारण बैठक संपन्न ; नैसर्गिक संकटास कृत्रीम संकटात रूपांतरित करणाऱ्या अधिकाऱ्यांना खडसावले ; नुकसान भरपाई सर्वेक्षणातून एकही पूरग्रस्त सुटता कामा नये- आ.किसनराव वानखेडे….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :- उमरखेड व महागाव तालुक्यातील 133 गावांमध्ये दि.15 व 16 ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटी सदृश कोसळलेल्या मुसळधार पावसाने दोन्ही तालुक्यातील 133 गावांमधील 87,166 शेतकऱ्यांच्या 65,494 हेक्टर शेतीचे पूर्णतः नुकसान झाले आहे. ढगफुटी सदृश पाऊस तसेच इसापूर व पूस धरणामधून करण्यात आलेला वाढीव पाण्याचा विसर्ग यामुळे नदी लगत व इतर ही ठिकाणच्या शेतजमिनी पूर्णतः खरडून गेल्या आहेत.
नदी, नाल्यालगत असलेल्या अनेक घरांमध्ये भरपूर पाणी शिरले. पूर्णतः बाधितांसह अल्पक्षेत्राचे देखील नुकसान भरपाईचे पंचनामे तात्काळ करा तसेच नुकसान भरपाई सर्वेक्षणातून एकही पूरग्रस्त सुटता कामा नये अशी ताकीद आमदार किसनराव वानखेडे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.
तर दोन्ही तालुक्यातील शेती,पुराच्या पाण्याने बाधित झालेल्या घरांसह सर्व पूरग्रस्तांच्या मदतीचे प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकारी यांना पाठविण्याच्या सूचना भाजपा,यवतमाळ व पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उपस्थित उमरखेड, महागाव येथील द्वय तहसीलदाराना दिल्या.
ते दि.19 ऑगस्ट रोजी संभाजी राजे उद्यान मधील सभागृहात आयोजित नैसर्गिक व कृत्रिम आपत्ती निवारण बैठकी दरम्यान दोन्ही तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांना उद्देशून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार नामदेवराव ससाणे व स्थानिक उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर नैसर्गीक आपत्तीस कृत्रीम आपत्तीत परावर्तित करून शेतकऱ्यांवर सुलतानी संकट ओढावून आणणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार किसनराव वानखेडे, भाजपा जिल्हा समन्वयक नितिन भुतडा यांनी चांगलेच धारेवर धरले.
राष्ट्रीय महामार्ग क्र.361 लगत असलेल्या शेतीचे नुकसान कसे झाले भुतडा यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. नॅशनल हायवेच्या नाकर्तेपणामुळे शेतकर्यांच्या शेतात पाणी शिरल्याचे संबंधित अधिकाऱ्यांने मान्य केले.
उमरखेड-महागाव मतदार संघातील शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले तर अनेक घरे उद्धवस्त झालीत यावेळी नैसर्गिक व कृत्रिम आपत्ती कशी ओढावली व येणाऱ्या संकटास टाळण्याहेतूने तात्काळ काय उपाययोजना करता येतील यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मागील दोन दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उमरखेड तालुक्यातील 44 गावातील 52,340 शेतकऱ्यांची 47,560 हेक्टर जमीन पूर्णतः खरडून निघाली आहे. तर 2,709 घरांमध्ये पुराचे पाणी शिरून प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे महागाव तालुक्यातील 89 गावातील 34,826 शेतकऱ्यांची 17,934 हेक्टर जमीन पूर्णतः खरडून निघाली आहे.
एकंदरीत दोन्ही तालुक्यातील 133 गावांतील 87,166 शेतकऱ्यांच्या 65,494 हेक्टर शेतीचे पूर्णतः नुकसान झाले आहे.
मुख्य रस्त्यावरील पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही उपाय योजना न करणाऱ्या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांमुळे हिवरा ते काऊरवाडी हा रस्ता तब्बल १० तास बंद होता तर रस्त्यावरही खड्डे निर्माण झाले त्याचे पुनर्भरण न केल्यामुळे तेथे पाणी साचून ते लगतच्या शेतात शिरले.
नॅशनल हायवे च्या नाकर्तेपणामुळे तयार झालेल्या कृत्रीम पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले ते नुकसान हायवे प्रशासन भरून देणार का ? असा प्रश्न यावेळी नितिन भुतडा यांनी उपस्थित केला. .
यावेळी ham योजने अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळूनही अद्यापही सुरुवात न करणाऱ्या पुसद ते हरदडा रस्त्याच्या कंत्राटदारास धारेवर धरीत संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीस समज देण्यात आली .
यावेळी महसूल विभागांच्या अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन एकही आपदग्रस्त , नुकसानी ग्रस्त यादीतून ( सर्वेतून ) सुटला नाही पाहिजे यासाठी प्रयत्न करा व जे अधिकारी अतिवृष्टी सारख्या संकटात कामे करणार नाहीत त्यांची इन्क्रीमेंट बंद करा असे निर्देश आमदार किसनराव वानखेडे यांनी दिले .
तर या अतिवृष्टीत मतदार संघात ज्या लहान लहान पुलां व रस्त्यामुळे मार्ग बंद पडले तसेच जिथे पुलाची आवश्यकता आहे तिथे पुलाचे,रस्त्याचे आराखडे पुरहानी कार्येक्रमा अंतर्गत तयार करून पुल व रस्ते निर्मीती तसेच दुरुस्ती करण्याच्या सुचना सार्वजनिक बांधकाम विभाग व जि .प . बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
सदर अतिवृष्टीत मदतीच्या किंवा पंचनाम्याचे नावाखाली व इतरही कुठल्पा कामाबाबत जनतेची पिळवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच तलाठी व ग्रामसेवक हा पूरग्रस्त गावात मुक्कामी असलाच पाहिजे असे सुद्धा निर्देशित करण्यात आले.
सदर आपत्ती निवारण आढावा बैठकीस माजी आमदार नामदेव ससाने, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे उपस्थित होते.
याप्रसंगी उमरखेड, महागाव दोन्ही तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती संबंधीत तहसिलदार उमरखेड व महागांव, तालुका कृषी अधिकारी उमरखेड व महागांव , कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ , कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद ,गट विकास अधिकारी पंचायत समिती उमरखेड व महागांव,उपमुख्य अभियंता (निर्माण) मध्य रेल्वे वर्धा , कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग 2 यवतमाळ,कार्यकारी अभियंता सिंचन विभाग पुसद, कार्यकारी अभियंता महावितरण विभाग पुसद ,प्रकल्प संचालक, भा. रा. रा. प्रा. नांदेड,कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग उमरखेड , उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग उमरखेड , उपविभागीय अधिकारी उध्वं पैनगंगा प्रकल्प सिंचन शाखा उमरखेड व महागांव, उपविभागीय अभियंता, मृद व जलसंधारण अधिकारी, उमरखेड , मुख्याधिकारी नगर परिषद उमरखेड ,महागांव व ढाणकी , उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग उमरखेड व महागांव,कार्यकारी अभियंता उध्वं पैनगंगा प्रकल्प नांदेड हे प्रामुख्याने उपस्थित होते.
मी स्वतः उमरखेड – महागाव विधानसभेतील ५० टक्के नुकसानग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी केली.
झालेल्या नुकसाना बाबत व भविष्यातील नुकसान टाळण्या हेतूने कायमस्वरूपी उपाययोजना बाबत सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना पुरहानी कार्येक्रमा अंतर्गत प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. तसेच 100 टक्के पुरग्रस्त कुटुंबातील खाजगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासंबंधीचा पत्रव्यवहार संबंधित शाळांशी करून तोडगा काढण्याच्या सूचना देखील यावेळी दिल्या :- नितिन भुतडा
भाजपा, यवतमाळ व पुसद जिल्हा समन्वयक…
पुरांमुळे पुढील 2 महिन्यांचे रोजमजुरीचे साधन संपुष्टात आल्याने पूरग्रस्त गावातील नागरिकांसाठी वाढीव इष्टांका नुसार सप्टेंबर, ऑक्टोबर यादोन महिन्याचा धान्य पुरवठा करण्याच्या सूचना यावेळी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिल्या आहेत :-
किसनराव वानखेड :- आमदार, उमरखेड विधानसभा…