पुसद शहरात उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला जागतिक आदिवासी दिन….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- जागतिक आदिवासी दिन हा केवळ उत्सव नसून, आदिवासी समाजाच्या अधिकार, परंपरा आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. ऐतिहासिक संघर्ष, शिक्षण आणि सामाजिक एकतेचा वारसा जपण्यासाठी उपस्थितांनी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या बलिदानाची आणि लढाऊ वृत्तीची आठवण करून देत, पुसद शहरात हा दिवस ऐतिहासिक वातावरणात, उत्साह आणि ऐक्याने साजरा झाला.
क्रांतिवीर बिरसा मुंडा तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महामानवांच्या जयघोषांनी परिसर दणाणून गेला. “जागतिक आदिवासी दिन चिरायू हो..!” या एकाच सुरात निघालेल्या घोषणेने आसमंत दुमदुमून गेला.
आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त सकाळपासूनच क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक येथे आदिवासी युवक, युवती, विद्यार्थी तसेच महिला-पुरुषांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. सर्वांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. या प्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आरतीताई फुपाटे, बिरसा ब्रिगेडचे पांडुरंग व्यवहारे, नानाभाऊ बेले, मारोती भस्मे, सूनिता पांडुरंग मळघणे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश धनवे, आदिवासी विकास परिषदेचे सुनील ढाले, ॲड. रामदास भडंगे, गजानन टारफे, बिरसा अकॅडमी चे संचालक राजेश ढगे, आदिवासी सेवक नारायण कराळे यांच्यासह आदिवासी कर्मचारी संघटनेचे कर्मचारी पदाधिकारी यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे बुद्ध रत्न भालेराव, सामाजिक कार्यकर्ते विजय भेलके, रवी तायडे, नारायण पुलाते यांच्यासह विविध समाजघटकांच्या नागरिकांनीही सहभागी होऊन बिरसा मुंडा यांना अभिवादन केले.