आदिवासींचं आरक्षण काढण्याचं काम हे सरकार कधीही करणार नाही :- उपमुख्यमंत्री शिंदे….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “आदिवासी जल, जंगल, पर्यावरण व जमिनीचा संरक्षणकर्ता असून भूमीपुत्र आहे. घटनेने दिलेलं आदिवासींचं आरक्षण काढण्याचं काम हे सरकार कधीही करणार नसल्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
जागतिक आदिवासी दिन अकोले बाजार तळावर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. जालिंदर भोर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमास आ. विठ्ठलराव लंघे, आ.अमोल खताळ, शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, समन्वयक बाळासाहेब भोर, जिल्हा उपध्याक्ष मारुती मेगाळ, जगन देशमुख, तालुकाध्यक्ष सुशांत गजे, सचिन शेटे, शर्मिला येवले उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आदिवासी हमारा गर्व, हमारी शान, देश का स्वाभिमान है. काळ्या आईची ही लेकरं समाजाच्या मुख्य प्रवाहात आली पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. शिवसेना हा पक्ष मालक व नोकरांचा नाही तर कार्यकर्त्यांचा असून मी कार्यकर्त्याचेच काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाकडे माजी खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाजीराव दराडेसह पदाधिकार्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही
रक्षाबंधनाच्या दिवशी होणार्या या कार्यक्रमात शमिला येवले यांच्यासह महिलांनी लाडका भाऊ म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बहिणीना शुभेच्छा दिल्या. लाडक्या बहिणीमुळे एकनाथ शिंदे यांना लाडक्या भावाची ओळख मिळाली असून ‘लाडकी बहीण योजना’ कधीही बंद होणार नसल्याचे त्यांनी लाडक्या बहिणींना आश्वासित केले.