डिसेंबरपर्यंत अनुकंपा तत्त्वावरील सर्व भरती करणार; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सहमतीनुसार डिसेंबरपर्यंत अनुकंपा तत्त्वावरील सर्व नियुक्त्या पूर्णपणे करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता.२५) रोजी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पाच व विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयांमधील पाच असे एकूण दहा मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, नॅकचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे, कुलसचिव डॉ. अविनाश असणारे आदी उपस्थित होते.
दरम्यान, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागातील वरीष्ठ प्राध्यापक डॉ. अनिता पाटील यांनी किडनी स्टोनवरील औषधाकरीता संशोधन करून पेटेन्ट मिळविले आहे.
त्या पेटेन्टचे विद्यापीठाने व्यावसायिकीकरण केले आहे. त्यांनी सदर संशोधनाद्वारे किडनी स्टोनवरील तयार केलेले औषध क्रश कॅप्सूल कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांचे हस्ते ना. चंद्रकांत पाटील यांना प्रदान करण्यात आले. यावेळी मंत्री महोदयांनी कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते व डॉ. अनिता पाटील यांचे अभिनंदन करून विद्यापीठांतील शिक्षकांनी आपल्या पेटेन्टचे व्यावसायिकीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.