एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये, शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बोलावली तातडीची बैठक….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आपल्या पक्षाच्या सर्व मंत्र्यांची आज तातडीची बैठक बोलावली आहे. गेल्या काही दिवसांपासूनच्या राजकीय घडामोडी पाहता या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे.
खरंतर महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे दोन नंबरचे मंत्री आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील दोन नंबरचे मंत्री आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नंबर लागतो. कारण अजित पवार यांची राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार होतं. तीन वर्षांपूर्वी सत्तांतर झालं तेव्हा एकनाथ शिंदे हे राज्याचे एक नंबरचे मंत्री म्हणजे मुख्यमंत्री बनले होते. तर देवेंद्र फडणवीस हे दोन नंबरचे मंत्री होते. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. पण विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री बनले. तर एकनाथ शिंदे हे बॅकफूटला गेले.
एकनाथ शिंदे हे दिवस-रात्र विविध जिल्ह्यांचा दौरा करत जनसामान्यांपर्यंत पोहोचून काम करत आहेत. त्यांच्या कामाची तीच पद्धत आहे. त्यामुळे ते जनसामान्यांमध्ये लोकप्रिय देखील आहेत. असं असलं तरीही गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला धक्का लागाव्या अशा घटना त्यांच्या पक्षाच्या आमदार आणि मंत्र्यांकडून झाल्या आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टिनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली. दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट यांचा एक कथित घरातला फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये कथित पैशांची बॅग दिसली होती. त्या फोटोमुळे देखील मोठा राजकीय राडा झाला होता.
शिवसेनेचे संदीपान भुमरे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करुन आपल्या भाऊजयीला बिअरशॉपचा परवाना मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला होता. तर धुळ्यात शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्याकाच्या नावाने बुक असलेल्या रुममध्ये कोट्यवधी रुपयांचे पैशांचे घबाड सापडल्यामुळे मोठा राजकीय वाद झाला होता. या सगळ्या घडामोडींनंतर विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान एकनाथ शिंदे एकेदिवशी रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या या दौऱ्याची देखील प्रचंड चर्चा झाली होती. या सगळ्या घडामोडींनंतर आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थान असलेल्या ‘मुक्तागिरी’ बंगल्यावर आज रात्री बैठक बोलावण्यात आली आहे. आज रात्री नऊ वाजता ही बैठक बोलवण्यात आली आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पण गेल्या काही दिवसांपासूनच्या घडामोडी पाहता या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे.