जयंत पाटलांसोबतचं कोल्ड वॉर शमलं, रोहित पवारांना आता मोठी जबाबदारी, पक्षातील सर्व आघाड्यांच्या प्रमुखपदी वर्णी..!

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रोहित पवार यांना पक्षाच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
त्यामुळे पक्षातील सर्व आघाड्यांचे प्रमुख म्हणून रोहित पवार काम करणार आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये खांदेपालट करण्यात आला आहे. जयंत पाटलांच्या नंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आता शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यानंतर आता आमदार रोहित पवार यांच्यावरही मुख्य सचिवपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती आहे.
जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचं चित्र होतं. त्यामुळे जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष पदावर असेपर्यंत रोहित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. आता जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर आणि शशिकांत शिंदे यांच्या नवनियुक्तीनंतर रोहित पवारांवर मुख्य सचिव पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे अशी माहिती आहे.
शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीत आज नव्या कॅप्टनची निवड करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि सर्वानुमते शशिकांत शिंदे यांच्या नावाची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी घोषणा करण्यात आली. शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला चांगला विजय मिळवून देण्याची त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे.
जयंत पाटील काय म्हणाले?
या आधी जयंत पाटील यांनी जवळपास 8 वर्षे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी काम केलं. त्यांच्यानंतर ही जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे आली. आपल्या पदाचा राजीनामा देताना जयंत पाटील काहीसे भावुक झाल्याचं दिसून आलं. पदाधिकाऱ्यांसमोर केलेल्या भाषणात ते म्हणाले की, “आतापर्यंत काम करत असताना माझी कोणतीही संघटना निर्माण केली नाही किंवा वेगळा गट केला नाही. असलं पाप कधी केलं नाही. 2 हजार 633 दिवस मी प्रदेशाध्यक्ष आहे. आता पदावरुन बाजूला व्हायची ही योग्य वेळ आहे. सगळे सहकारी गेले तरी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. बायकोला सांगितलं, सात वर्षात एकदाही सुट्टी घेतली नाही. दोन खासदार असलेला भाजप मोठा होऊ शकतो तर 10 आमदार असलेला आपला पक्ष मोठा का होऊ शकत नाही?”