भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा ‘ठाकरे सैनिकां’ना आव्हान, म्हणाले, “हिंमत असेल तर.”

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीवरून महाराष्ट्रात वाद पेटला असतानाच भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीवरून आक्रमक झालेले ठाकरे बंधू आणि मराठी माणसांना महाराष्ट्राबाहेर आल्यास आपटून आपटून मारण्याचा इशारा दिला होता.
त्यावरून राज्यात संतापाची लाट उसळली होती. भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे लागले होते. मात्र एवढं सगळं घडून गेल्यानंतरही निशिकांत दुबे यांचा तोरा कायम असून, त्यांनी पुन्हा एकदा मराठी माणसाला डिवचणारं विधान केलं आहे. तुम्ही गरीबांना मारता, पण मुंबईमध्ये मुकेश अंबानी साहेब राहतात. ते खूप कमी मराठी बोलतात. हिंमत असेल तर त्यांच्याजवळ जा. एवढंच नाही तर माहीममध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम राहतात, हिंमत असेल तर जरा तिकडेही जाऊन या, असं आव्हान निशिकांत दुबे यांनी दिलं आहे.
निशिकांत दुबे पुढे म्हणाले की, स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन मराठीत बोलत नाहीत. ते आंध्र प्रदेशमधील आहेत, ते तेलुगु भाषेत बोलतात. आता तुम्ही त्यांना मारहाण करून पाहा. एलआयसीचे चेअरमन ईशान्य भारतातील आहेत. त्यांनाही मारहाण करून पाहा. जे गरीब लोक आहेत. जे उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्रात आले आहेत. ज्यांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला योगदान दिलं आहे तुम्ही त्यांनाच मारहाण करता, असा सवाल दुबे यांनी विचारला.
यावेळी आपटून आपटून मारणार या आपल्या आधीच्या विधानावर स्पष्टीकरण देताना निशिकांत दुबे म्हणाले की, महाराष्ट्राचं देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्येही महाराष्ट्राचं महत्त्वाचं योगदान आहे. मी इतर भाषांप्रमाणेच मराठीचाही सन्मान करतो. जसं मराठी माणसाचं मराठी भाषेवर प्रेम आहे, त्याचप्रकारे हिंदी भाषिकांचं हिंदी भाषेवर प्रेम आहे. त्यामुळे जर भाषेच्या आधारावर ठाकरे कुटुंबीय मारहाण करत असतील तर ते आम्ही सहन करणार नाही.
दरम्यान, आपल्या आधीच्या विधानांवर ठामअसल्याचं सांगत निशिकांत दुबे पुढे म्हणाले की, बँक ऑफ इंडिया आणि एलआयसी जो कर भरतात, त्याचं मुख्यालय मुंबईत आहे. आता मी सिक्कीममध्ये उभा आहे. येथील लोकसुद्धा एसबीआयमध्ये पैसे जमा करतात. त्यांचा गुंतवलेला पैसाही तिथेच आहे. मात्र त्यांनी भरलेल्या कराचा पैसा महाराष्ट्राच्या खात्यामध्ये जमा होतो, असे सांगत निशिकांत दुबे यांनी भाषावादाबात गंभीर चिंताही व्यक्त केली.