पालकमंत्रिपदावरून कोणतेही वाद नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महायुती सरकारमध्ये पालकमंत्रिपदावरून कोणतेही वाद नाहीत, काही कुरबुरी असतील त्यावर चर्चेतून मार्ग निघेल, अशी स्पष्टोक्ती महसूल मंत्री व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
ते म्हणाले, सातारा, संभाजीनगर, यवतमाळ येथे आमचे मंत्री असतानासुद्धा शिवसेनेला पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. पालकमंत्रिपदाबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मिळून निर्णय घेतला आहे. महायुतीचे सरकार हे समन्वयाने चालवावे लागते. ठाण्यापासून संपूर्ण कोकणच्या पट्ट्यात राष्ट्रवादीला कुठेच पालकमंत्रिपद मिळाले नव्हते.
त्यामुळे त्यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच, नाशिक येथे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रिपद देण्याची मागणी असल्याने निर्णय घेण्यात आला, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राज्यात जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येते तेव्हा काही घटकांकडून महाराष्ट्र अशांत करण्याच प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.
संघाबरोबरच्या समन्वय बैठकीबाबत विचारले असता, ही बैठक नेहमीच असून, यात विचार परिवारात काम करणाऱ्या संस्थांबरोबर समन्वय साधला जातो, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबाबत समाजात जनजागृती करण्याची गरज असून, आमचे सरकार लवकरच या योजनेला व्यापक प्रसिद्धी देऊन जनजागृती करणार आहे. या बाबत ज्या संस्थांना ही योजना राबवायची आहे त्यांनी पुढाकार घेऊन सरकारशी संपर्क साधावा, असे बावनकुळे म्हणाले.
सत्ता न मिळाल्याने विरोधक अस्वस्थ
सत्ता न मिळाल्याने विरोधक अस्वस्थ आहे. त्यांचा मानसिक पराभव झाला आहे. त्यामुळेच विरोधक सैफ अली खान यांच्यावरील हल्ला प्रकरणाचे तसेच बीड आणि परभणी येथील घटनांचे राजकारण करत आहेत. वास्तविक, अशा घटनांचे कोणीही अजिबात राजकारण करू नये. संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी आमच्या महायुतीकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा आपली महाविकास आघाडी कशी टिकेल, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचा टोलाही या वेळी लगावला.