शिर्डीत होणार भाजपचं अधिवेशन, २२ हजार पदाधिकारी येणार; अमित शाह यांचीही उपस्थिती असणार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर भाजपाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर साईनगरीत भाजपचे शनिवार व रविवारी राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
राज्यातून तब्बल २२ हजार पदाधिकारी या अधिवेशनाला येणार असून त्यांच्या निवासाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे होत असलेल्या या अधिवेशनाला महत्त्व आले आहे. पक्षाच्या पुढील अध्यक्षाचीही या अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता आहे.
रविवारी सकाळी १० वाजता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा पक्षाचा ध्वज फडकावून व प्रतिमा पूजनाने अधिवेशनाचा श्रीगणेशा करतील. सायंकाळी ५ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. शाह यांच्या हस्ते संविधान पूजनही करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे नियोजनासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आठ दिवसांपासून शिर्डीत तळ ठोकून आहेत. मंडप, स्टेज, बैठक, भोजन, वाहनतळ, निवास, याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, शनिवारी (दि. ११) केंद्रीय अध्यक्ष नड्डा, मंत्री, खासदार, आमदारांशी हितगुज करणार आहेत. शहरातील व कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे दुभाजक, त्यातील सिमेंट कुंड्या, विजेचे खांब याचा खुबीने वापर करून संपूर्ण मार्ग भाजपमय करण्यात आला आहे, दोन हजारावर झेंडे, २० स्वागत कमानी, फलक लक्ष वेधून घेत आहेत.
अधिवेशनाचे निमंत्रण कोणाला?
भाजपाचे राष्ट्रीय, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस अशा पदाधिकाऱ्यांना अधिवेशनासाठी निमंत्रित करण्यात आलेले आहे. राज्यातून २२ हजार पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. मुक्कामी पदाधिकाऱ्यांसाठी भक्तनिवास व काही हॉटेल्स आरक्षित करण्यात आलेले आहेत.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!