राजन साळवी सोडणार ठाकरेंची साथ..? विधानसभेतील पराभव जिव्हारी…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “माझ्या पराभवाला पक्षातील काही वरिष्ठ मंडळी कारणीभूत असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी विधानसभेतील निवडणुकीतील त्यांच्या पराभवाचे खापर पक्षातील नेत्यांवरच फोडले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर मी नाराज होतो आणि नाराज असल्याचे सांगच शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाहेर पडण्याचे सूतोवाच त्यांनी दिले आहेत.
साळवी यांनी शनिवारच्या बैठकीत रत्नागिरीचे माजी खासदार विनायक राऊत यांच्याविषयी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे स्पष्ट नाराजी व्यक्त केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. साळवी हे पक्षात नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. विधानसभेत झालेल्या पराभवानंतर ते शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोडणार असल्याचे बोलले जात आहे.
साळवी यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत ‘मातोश्री’निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पक्षाचे नेते खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
माध्यमांशी बोलताना साळवी म्हणाले, ”विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर मी नाराज होतो आणि नाराज आहे. मी माझ्या भावना उद्धव ठाकरे यांना सांगितल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे मला माहीत आहेत. मात्र, माझ्या पराभवाला कारणीभूत ज्या घटना आहेत. त्याबद्दल मी नक्कीच नाराज होतो आणि आहे. माझ्या नाराजीच्या भावना उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या आहेत.”
पराभवाला वरिष्ठ मंडळी कारणीभूत
माझ्या पराभवाला काही वरिष्ठ मंडळी कारणीभूत आहेत. मी आज त्यांचे नाव घेऊ इच्छित नाही. मात्र, कोण आहे हे शोधणे गरजेचे आहे. जर ते शोधले नाही तर आता माझ्यावर जी वेळ आली, तीच वेळ भविष्यात आणखी कोणावर येऊ शकते. मात्र, अशी वेळ येऊ नये, यासाठी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि मी योग्यवेळी योग्य निर्णय घ्यायला सक्षम आहे असे सांगत राजन साळवी यांनी पक्ष सो़डण्याबाबत सूतोवाच केले असले तरी त्यास दुजोरा मात्र दिलेला नाही.