महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, ‘अदृश्य’ शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- *लोकसभेला झटका बसल्याने यांना ‘लाडकी बहीण’ आठवली. बहीण-भावाचे नाते पवित्र आहे. मात्र दुर्दैवाने त्यांनी नात्याची पंधराशे रुपये किंमत केली.”
‘अदृश्य’ शक्तीने राज्यातील दोन पक्ष फोडण्याचे कारस्थान रचून महायुती सत्तेत आली आहे.
राज्यात महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. राज्यातील महिला सुरक्षित राहिल्या नाहीत. यामध्ये परिवर्तन करण्यासाठी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) साथ देण्याचे आवाहन शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले.
उमेदवार वैभव पाटील (Vaibhav Patil) यांच्या प्रचार सभेचे येथील बचत भवनाच्या मैदानावर आयोजन केले होते, त्या वेळी खासदार सुळे बोलत होत्या. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब मुळीक, हणमंतराव देशमुख, रावसाहेब पाटील, चंद्रहार पाटील, विष्णुपंत चव्हाण, अनिता पाटील, जयमाला देशमुख, कविता म्हेत्रे आदी उपस्थित होत्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘लाडकी बहीण’ ते राज्यात वाढलेली महागाई, पक्षफोडीचे राजकारण, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि आरक्षणावर प्रकाश टाकला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”लोकसभेला झटका बसल्याने यांना ‘लाडकी बहीण’ आठवली. बहीण-भावाचे नाते पवित्र आहे. मात्र दुर्दैवाने त्यांनी नात्याची पंधराशे रुपये किंमत केली. दिले जाणारे पंधराशे रुपये ते खिशातील देत नाहीत. त्यांच्या अशा घोषणाला भीक घालू नका. आघाडी सत्तेवर आल्यावर महिलांना तीन हजार रुपये देणारी महालक्ष्मी योजना सुरू करू. महिलांना पंधराशे रुपये देऊन महागाईत मोठी वाढ केली. आमचा शब्द आहे, पाच वर्षांत कसलीही महागाई वाढवणार नाही. बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराचा प्रश्न गंभीर बनला.
राज्यातील हक्कांच्या सहा लाख नोकऱ्या गुजरातला पळवल्या. दिवंगत आर. आर. पाटील गृहमंत्री असताना पारदर्शक पोलिस भरती राबवली होती. आताच्या गृहमंत्र्यांचा कारभार पाहता तेच बंदूक घेऊन फिरतात, तर आम्ही संविधान घेऊन फिरतो. आम्ही पारदर्शक भरती करणार. मतदारसंघात बंडखोरी केली असली तरीही आटपाडीच्या साखर कारखान्याला मदत केली जाईल.”
त्या म्हणाल्या, ”मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षण प्रश्नावर सर्वाधिक आवाज राष्ट्रवादीने संसदेत उठवला. वैभव पाटील यांनी भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. विट्यातून खाली येताना उमेदवाराला विचारून यावं लागतं. निवडणुकीच्या तोंडावर गाडी, नारळाचं पोतं टाकून कुठे पण फोडत सुटले होते. दहा वर्षांत त्यांना आटपाडीचा आणि विटाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न दिसला नाही.” यावेळी हणमंतराव देशमुख, रावसाहेब पाटील यांची भाषणे झाली. सूरज पाटील यांनी स्वागत केले. यावेळी उमेश पाटील, राजकुमार पडळे, जालिंदर कटरे, बळिराम रणदिवे आदी उपस्थित होते.
महिलांची लक्षणीय उपस्थिती
सुळे यांच्या प्रचार सभेला महिलांची लक्षवेधी उपस्थिती होती. सभेला जेवढी पुरुष मतदारांनी जागा भरली होती, तेवढीच महिला मतदारांनी भरली होती. तसेच सभेत वारंवार महिलांचे पुरुषांपेक्षा जास्त आणि मोठ्या घोषणा देत होत्या. महिलांच्या घोषणांनी सभास्थळ दणाणून सोडले होते. तसेच व्यासपीठावरही महिला नेत्यांचीही उपस्थिती चांगली होती. भाषणात सुळे यांनी, शरद पवार यांनी महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान कायदेशीर वाटा दिल्याचे आणि राजकारणात महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यावर सभेतून टाळ्यांचा कडकडाट झाला.
‘महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण’
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू आहे. ‘अदृश्य’ शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले. महागाई आणि बेरोजगारी वाढवली. भाजपच्या संगतीने मित्रपक्षांनाही तसेच गुण लागले आहेत. भाजपचे मोठे नेते कार्यकर्त्याला लाथा मारतातस, तर धनंजय महाडिक सारखे फोटो काढण्याची भाषा करतात. हेच यांचे संस्कार आहेत.”