दिग्गजाची विधान परिषद वारी चुकणार काँग्रेसचे उपेक्षिताना संधी देण्याचे सूतोवाच
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर
लोकसभा, विधानसभेत अपयशी ठरलेल्या तसेच यापूर्वी मंत्रिपद उपभोगलेल्या दिग्गज नेत्यांची विधान परिषदेची वारी चुकणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेसने यावेळी अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या मात्र उपेक्षित राहिलेल्यांना परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच उमेदवारांची नावे जवळपास निश्चित केल्याचे समजते. यात मुळचे गडचिरोली आणि नागपूर कर्मभूमी असलेल्या एका कार्यकर्त्याची लॉटरी लागणार असल्याची चर्चा आहे.
राज्यपाल नियुक्त एकूण 12 जागा रिक्त झाल्या आहेत. महाआघाडीत समान जागा वाटप करण्याची मागणी कॉंग्रेसने केली आहे. शिवसेना पाच, राष्ट्रवादी चार जागा घेऊन कॉंग्रेसची तीन जागांवर बोळवण करण्याची चर्चा होती.यास कॉंग्रेसत्या नेत्यांनी उघड विरोध केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीसुद्धा भेट घेतली होती. महाआघाडीच्या सत्तास्थापनेच्यावेळी दिलेल्या आश्वासनांचे स्मरणही करून देण्यात आले होते. यानंतर हा वाद क्षमला होता.
समान जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाले असेल तर कॉंग्रेसच्या वाट्याला चार जागा येतील. अन्यथा तीन जागांवर समाधान मानावे लागणार आहे. पुनर्वसनासाठी अनेक कॉंग्रसेचे नेते धडपड करीत आहेत. यात नागपूरच्याही अनेक नेत्यांचा समावेश आहे. मात्र, यंदा यापूर्वी आमदार व मंत्रीपद उपभोगलेल्या उमेदवारांऐवजी अनेक वर्षांपासून संघटनेत काम करीत असलेल्या, तांत्रिक अडचणींमुळे विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही त्यांना विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय झाल्याचे समजते. त्यामुळे अनेक माजी मंत्री, आमदारांची निराशा झाल्याचे समजते.
इच्छेला घालावी लागणार मुरड
माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी विधान परिषदेची निवडणूक लढण्यास नकार दिला. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनीसुद्धा शांत बसणेच पसंत केले. अभिजित वंजारी यांनी वेळेवर न लढण्याचा निर्णय घेतला. माजी आमदार आशीष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्याचे धाडस दाखवले. यापैकी अनेक जण विधान परिषदेत जाण्यास इच्छुक आहेत. मात्र, पक्षाच्या निर्णयामुळे सर्व इच्छुकांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागणार असल्याचे दिसते.