शिंदे गटांच्या तीन आमदारांनी ठाकरेंशी केली गुफ्तगू….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसह महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
लोकसभेच्या निकालानंतर शिंदे गटाच्या मुंबई आणि मराठवाड्यातील मिळून तीन आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या एका खास निकटवर्तीय नेत्याची भेट घेतली. पहाटेपर्यंत चाललेल्या या भेटीतून काही निष्पन्न झाल्यास मोठ्या घडामोडी घडू शकतात. भारतीय जनता पक्षाच्या चाणक्य नीतीतून शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४२ आमदार गेले. शिंदे यांनीही या आमदारांच्या मतदारसंघात कोट्यवधींचा निधी दिला आणि त्यांची कामेही केली. या निधीचा आणि कामांची पहिली परीक्षा झाली ती या लोकसभा निवडणुकीत.
शिंदे गटाच्या निम्म्याहून अधिक विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पिछाडीवर पडले. एवढेच नव्हे तर, लोकांनी फोडाफोडीच्या राजकारणावर राग काढल्याने खुद्द शिंदे गटाच्या या आमदारांचे मताधिक्य त्यांच्या मतदारसंघात घटल्याचे चित्र त्यातून पुढे आले. उदाहरणार्थ बुलडाण्यात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव जिंकले असले तरी खुद्द बुलडाणा विधानसभेत शिंदे गटाचे अत्यंत आक्रमक असलेले आमदार संजय गायकवाड मताधिक्य घटल्याने रेड झोनमध्ये आहेत. हिंगोलीतही असेच एक भयंकर आक्रमक आमदार म्हणून प्रतिमा असलेले संतोष बांगर कळमनुरीत सुमारे वीस हजार मतांनी पिछाडीवर फेकले गेले आहेत.
छत्रपती संभाजीनगरातून संदीपान भुमरे लोकसभेवर जिंकून गेले असले तरी त्यांच्या पैठण मतदारसंघात शिंदे गटाची पीछेहाट तब्बल २६-२७ हजार मतांची आहे. संभाजीनगरातही प्रदीप जैस्वाल २६, १९७ मतांनी रेड झोनमध्ये फेकले गेले आहेत. अब्दुल सत्तार सिल्लोड विधानसभा मतदारसंघात सत्तावीस हजारांनी रेड झोनमध्ये गेले आहेत. मुंबईत दिलीप लांडे आणि मंगेश कुडाळकर हे दोन आमदार देखील रेड झोनमध्ये गेले आहेत. त्यातही कुडाळकर तर २३ हजार ५६४ मतांनी पिछाडीवर आहेत. ही शिंदे गटाच्या पिछाडीवर गेलेल्या काहीच आमदारांची उदाहरणे असून एकूण निकालांनी मात्र शिंदे गटाच्या अनेक आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.
शिंदे गटाला लोकसभेच्या सात जागा मिळाल्या असल्या तरी त्यातील तीन जागा तिरंगी लढतीत मिळाल्या आहेत. उर्वरित चार मतदारसंघांत देखील भाजपची मते मिळाली म्हणून पंधरापैकी सात असा हा स्ट्राईक रेट आल्याचे शिंदे गटातील आमदारांनाही वाटते. केवळ चार महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून लोकसभा निकालांचा धक्का बसलेल्या शिंदे गटाच्या किमान तीन आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेत्याची मुंबईत गुप्त भेट घेतली आणि ठाकरे गटात प्रवेशाची चाचपणी केली. सुमारे पहाटेपर्यंत ही गुप्त भेट चालल्याचे कळते. मुंबईतील दोन आणि मराठवाड्यातील एका आमदारांनी ही गुप्त बैठक होती. पक्षात प्रवेश मिळावा आणि तिकीटाची हमी यावर या बैठकीत या आमदारांनी चर्चा केली.
दरम्यान, शिंदे गटात गेलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात घ्यायचे नाही, अशी भूमिका सुरुवातीला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. परंतु पक्षात येवू पाहणाऱ्यांसाठी दरवाजे बंद करू नका, येतील त्यांचे स्वागत केल्यास ते बेरजेचे राजकरण ठरेल, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी उद्धव यांना दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून सुटून पुन्हा ठाकरेंकडे जाऊ पाहणाऱ्या सर्वच आमदारांचे परतीचे दोर कापलेले नाहीत. मात्र ज्या आमदारांनी शिंदे गटात गेल्यावर अत्यंत खालच्या पातळीवर ठाकरे कुटुंबांवर टीका केली त्यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पक्षात घेतले जाणार नाही, असे ठाकरे गटाचे धोरण ठरले आहे. या धोरणानुसारच शिंदे गटाच्या या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेत्याची भेट घेतली. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार या आमदारांना प्रवेश देण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. विधानसभेचे शेवटच्या अधिवेशनानंतर म्हणजे जुलैनंतरच या परतीच्या पक्षांतराचे फटाके वाजूशकतात.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….