शासन निर्णय आणि लोकहितासाठी गणेशोत्सव साधेपणाने प्रमुख मंडळांच्या अध्यक्षांबरोबर मुख्यमंत्र्यांची ऑनलाइन बैठक
पोलिटिव्स स्पेशल लाईव्ह
करोनाचे संकट असल्याने शासन निर्णय आणि लोकांचे हित ध्यानात घेऊन यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करू, असे प्रमुख गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी सांगितले. टाळेबंदीचे निर्बंध आणखी शिथिल झाल्यानंतर सर्व गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करून उत्सवाची अंतिम रूपरेषा ठरविली जाईल, अशी ग्वाही या वेळी देण्यात आली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणपती भवन येथील इमारतीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांनी संवाद साधला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, शासन निर्णयानुसार आम्ही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करू. गणेशोत्सव मंडळे शासनासोबत आहेत.
अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात म्हणाले, शासन निर्णयानुसार आरोग्यदायी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यापुढील काळात सर्व गणेशोत्सव मंडळांसोबत चर्चा करून साधेपणाने आणि निर्विघ्नपणे उत्सव साजरा केला जाईल.
मिरवणुकांना परवानगी देणे अशक्य
गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ न देता आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे. यंदा मिरवणुका न काढता मंडळांनी दहा दिवस आरोग्यदृष्टय़ा काम करायला हवे. वारीला परवानगी देता आली नाही. त्याप्रमाणे गणेशोत्सवात मिरवणुकांना परवानगी देणे यंदा शक्य नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यंदाचा उत्सव वाजतगाजत शक्य नाही. त्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने म्हणजे नेमका कसा, याविषयी मार्गदर्शक तत्त्वे आपण ठरवायला हवीत. त्यावर चर्चा करून पुन्हा होणाऱ्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करू, असे त्यांनी सांगितले.
करोना आणि पाऊस अशा दोन आघाडय़ांवर आपल्याला लढायचे आहे. उत्सवाची परंपरा कायम ठेवून स्वरूपात बदल करावे लागतील. प्रत्येकाने आपापल्या घरातून गणरायाचे पूजन करावे, अशी जागृती करून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न आपल्याला करायला हवा. लवकरच याबाबत बैठक घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.