संजय राऊतांविरोधात उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह लिखाण प्रकरण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाच्या मुखपत्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांची बदनामी होऊन देशाची प्रतिमा मलीन झाली, असा आरोप करत भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यावरून खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध उमरखेड पोलिसांनी सोमवारी उशिरा गुन्हा दाखल केला.
संपादक संजय राऊत हे नेहमीच जाणीवपूर्वक वृत्तपत्रातून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल व देशात अशांततेचे वातावरण निर्माण होईल, असे लिखाण करत असल्याचा आरोप भुतडा यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी आपल्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह व प्रक्षोभक असे विधान केल्यामुळे देशाची जागतिक पातळीवर बदनामी झाली. भारत हा धर्मविरोधी देश आहे, असे या लेखातून राऊत यांनी भासविले. राऊत यांचे लिखाण गंभीर स्वरुपाचे असून त्यांनी देशात दोन धर्मांत जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांना अटक करून देशद्रोही प्रक्षोभक वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार नितीन भुतडा यांनी उमरखेड पोलिसांत दिली.
त्या आधारे उमरखेड पोलिसांनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यावेळी भाजपा जिल्हा सचिव महेश काळेश्वरकर, अतुल खंदारे, पवन मेंढे, प्रतिक रुडे, प्रदीप शेरे, विक्की जोशी आदी उपस्थित होते.