माहूर तालुक्यातील मुलगी – जावयास भेटण्यास आलेला सासरा कोरोनाचा पहिला रुग्ण
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोरोना विषाणूची लागण झालेले जिल्ह्यात ४० रुग्ण झाले असतांनाच दि.९ मे रोजी सायंकाळी ७ वा. माहूर येथील रूग्णासह जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या तीन रूग्णासह चार रुग्णाचे स्वॅब तपासणीचे अहवाल पॉझेटिव्ह निघाल्याने जिल्ह्यात रुग्णाची संख्या ४४ झाली असून माहूर तालुक्यात कोरोनाबाधित पहिला रुग्ण निघाला आहे. स्वॅब अहवाल प्राप्त होताच माहूर तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धानोरा ता.उमरखेड जि.यवतमाळ येथील एक ६४ वर्षीय इसम माहूर तालुक्यातील माहूर पासून दोन की.मी.अंतरावर असलेल्या मालवाडा येथे आपली मुलगी व जावायास भेटण्यासाठी दि.६ रोजी उमरखेड वरून सकाळी ८ वा.दुधाच्या वाहनाने धनोडा जि.यवतमाळ पर्यत आला व तेथून केरोळी-शेकापूर-लांजी पर्यंत पायी चालत आला. तेथून जावयाने मोटरसायकलवरून मालवाडा येथे आणले. दि.७ रोजी सर्दी, ताप व दम लागणे असे लक्षणे दिसत असल्याने सकाळी ११:४५ वा. माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात तो नातेवाईकासह स्वतःहून हजर झाला. वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्ही.एन.भोसले यांनी त्या रुग्णास सामाजिक न्याय विभागाच्या मुलिच्या वस्तीगृहात उभारण्यात आलेल्या कोविड(कोरोना) केअर सेंटरमध्ये दाखल केले व दि.८ रोजी त्याचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविला असता दि.९ रोजी सायंकाळी ७ वा.प्राप्त झालेला सदर रुग्णाचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझीटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, गटविकास अधिकारी विशालसिंह चौहान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.साहेबराव भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्ही.एन.भोसले, यांनी दिली आहे. सदरील रुग्णाचे तीन महिन्यापूर्वीच मूत्रपिंडाचे ऑपरेशन झालेले असून त्यास रक्तदाबाचा आजार सुद्धा असल्याचे सांगितले. सदर इसमाचा जावाई हा भाजीपाल्याचा व्यापारी असून माहूरच्या बाजारपेठेत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारा असल्याने माहूर शहरात खळबळ उडाली आहे. त्या रुग्णाच्या नातेवाईकांना कोविड(कोरोना) केअर सेंटर मधील कर्मचाऱ्याना काही वेळातच क्वारंटाइन करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धेश्वर वरणगावकर यांनी दिली. सदर कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.