पीकविमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘नुकसान पुर्व सूचनेचे’ अर्ज द्यावे;अर्ज उशीराने केल्यास जास्त नुकसान भरपाई मिळेल हा गैरसमज
पीक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी तातडीने अर्ज द्यावे;कृषी विभागाने पुढील दोन ते तीन दिवसात पंचनामे पुर्ण करावे;पंचनाम्यात नमुद टक्केवारीनुसारच नुकसान भरपाई मिळणार;जिल्ह्यात 70 टक्के ते 100 टक्केपर्यंत शेतीपीकांचे नुकसान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 25 ऑगस्ट :-
अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतपीकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा मिळण्यासाठी ‘नुकसान पुर्व सूचनेचे’ अर्ज तातडीने विमा कंपनीकड द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक वीमा योजनेचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, पीक विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक रामेश्वर थोटे तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख पंधरा हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक वीमा योजनेसाठी नोंदणी केली आहे त्यापैकी आतापर्यंत केवळ एक लाख पन्नास हजार शेतकऱ्यांनीच नुकसान पुर्वसूचनाचे अर्ज सादर केले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांची हानी झाली असून कृषी विभागाने अशा शेतकऱ्यांचे विमा दाव्यासाठी आवश्यक नुकसान पुर्व सूचनेचे अर्ज शेतकऱ्यांकडून प्राप्त करून ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत नुकसान पुर्व सूचनेचे अर्ज आले नाही म्हणून विमा दावे नाकारल्याचे प्रकरणे होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कृषी अधिकाऱ्यांनी पुढील दोन ते तीन दिवसात नुकसानीचे व्यवस्थीत पंचनामे करून अहवाल सादर करावा. पंचनामे करतांना जिल्ह्यात 70 टक्के ते 100 टक्केपर्यंत झालेल्या नुकसानीनुसार संबंधीतांच्या नुकसानीच्या टक्केवारीचा स्पष्ट उल्लेख पंचनाम्यात करावा जेणेकरून विमा दाव्याची रकम मिळण्यास नुकसानग्रस्तांना अडचण येणार नाही .
काही शेतकऱ्यामध्ये नुकसान भरपाई अर्ज उशीराने केल्यास जास्त रकम मिळेल असा गैरसमज पसरला आहे, तथापि अर्ज आता सादर केला किंवा नंतर सादर केला तरी पंचनाम्यात नमुद टक्केवारीनुसारच नुकसान भरपाई मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी कोणत्याही संभ्रमात न राहता झालेल्या नुकसान भरपाईचे मागणी अर्ज लगेच सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
विमा कंपनीच्या कार्यालयाचा पत्ता कृषी विभागाने आपल्या कार्यालयात लावावा जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची माहिती होईल. जास्त पंचनामे शिल्लक असलेल्या ठिकाणी विमा कंपनीने आपले प्रतिनिधी वाढवून द्यावेत. ज्या तालुक्यात विमा कंपनीचे कार्यालय नाही किंवा यापुर्वी पावसामुळे फोन बंद असल्याने किंवा कंपनीच्या तक्रारनोंद प्रणालीत दोष असल्याने किंवा कंपनीचा टोल-फ्री नंबर न लागल्याने ज्यांच्या तक्रारी यापुर्वी नोंदविता आल्या नाही त्यांनी आता अर्ज सादर केल्यावर तसेच ज्यांनी माहे जुलै मध्ये ऑफलाईन अर्ज सादर केले आहे त्यांचे अर्जाची ऑनलाईन नोंद विमा कंपन्यांनी करून घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.
काही ठिकाणी एकापेक्षा जास्त वेळा आपत्ती आल्याने पुन्हा-पुन्हा नुकसान झाले असल्यास प्रत्येक वेळच्या आपत्तीसाठी नुकसान भरपाईचे अर्ज देता येतील. ज्या पंचनाम्यात जास्त नुकसान झाल्याची नोंद आहे त्याप्रमाणात जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठीचा अर्ज ग्राह्य धरण्यात येईल अशी माहिती विमा कंपनीतर्फे देण्यात आली.
बैठकीला कृषी विभागाचे व पीक विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.