कोविड लसीकरणाची गती वाढवा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे यंत्रणेला निर्देश ; लसीकरणात दुर्लक्ष नको ; दुसऱ्या डोजवर फोकस ; उन्हाळ्यामुळे सकाळी 7 पासून लसीकरण ; लसीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 11 मे :- कोविडचा धोका पुर्णपणे टळलेला नाही, इतर ठिकाणी कोरोनाचे रूग्ण अद्यापही आढळून येत आहे. कोरोनावर लसीकरण हाच एकमेव पर्याय असून लसीकरणात दुर्लक्ष न करता आरोग्य यंत्रणेने कोविड लसीकरणाची गती वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोविड टास्क फार्सच्या बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तालुकास्तरीय यंत्रणेकडून दूरदृष्य प्रणालीद्वारे कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, जिल्हा लसिकरण अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ, साथरोग अधिकारी डॉ. तनवीर शेख तसेच दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
जिल्हात 12 ते 14 वयोगटात लसचा पहिला डोज 44 टक्के तर 15 ते 17 वयोगटात 51 टक्के पुर्ण झाला आहे, हे प्रमाण वाढविण्यात यावे. तसेच 18 वर्षावरील वयोगटात दुसरा डोज 61 टक्के झाला असून दुसऱ्या डोजचे लसीकरण वाढविण्यावर यंत्रणेने विशेष फोकस करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
दुसऱ्या डोजसाठी पात्र झाल्यावरही अद्याप दुसरा डोज न घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस व प्रिकॉशन डोज देवून लसिकरण पुर्ण करणे, आवश्यकतेनुसार घरोघरी लसिकरणाची टिम पाठवणे, लसीकरणाची प्रलंबित डाटा एन्ट्री पुर्ण करणे, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने गावात लसिकरणासाठी शिबीरे घेण्याचे, एका लसिकरण केंद्रावर रोज किमान 100 डोज देण्याचे, उन्हाळा असल्याने लसिकरणाला सकाळी 7 वाजेपासूनच सुरूवात करण्याचे तसेच लसिकरणाचे ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जिल्हा कोरोमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांना लसिकरण पुर्ण करून घेण्याबाबत विविध माध्यमांतून जनजागृती करण्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील लसिकरणाची माहिती जिल्हा लसिकरण अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ यांनी बैठकीत सादर केली. जिल्हास्तरावर 1 लाख सहा हजार 100 कॉर्बोव्हॅक्स, 50 हजार कोव्हॅक्सीन व 42 हजार 900 कोविशिल्ड लससाठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगीतले
बैठकीला महसूल व आरोग्य विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.