अखेर ती बहुचर्चित पारधी कुटूंबिय गावात परतली ; माळवाकद येथील पारधी समाजावर लैंगिक अत्याचाराचे माध्यमातील वृत्त तथ्यहीन ; विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक ऊर्जा खर्ची घाला :- जिल्हाधिकारी अमोल येडगे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. २ :- माळवाकद येथील महिलांवर गावगुंडांनी लैंगिक अत्याचार केल्याने तेथील पारधी समाजाची काही कुटुंब गाव सोडून जंगलात राहायला गेल्याचे वृत्त चार दिवसांपूर्वी माध्यमातून प्रसारित झाले होते. याबाबत जिल्हा प्रशासनाने त्वरित दखल घेत सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी या गावात पोलीस, महसूल आणि महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवले असता महिलांवर लैंगिक अत्याचारांची घटना घडली नसल्याचे व याबाबचे माध्यमातील वृत्त तथ्यहीन असल्याचे तसेच फुस लावून गावाबाहेर रहायला गेलेले पारधी कुटुंबीय गावात परतले असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केले आहे.
फासेपारधी समाजबांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी उन्नती पर्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून फासेपारधी पुनर्वसन प्रकल्पाचा शुभारंभ महागाव तालुक्यातील माळवाकद येथे पोलीस विभागातर्फे काल करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, उपवनसंरक्षक अशोक सोनकुसरे, पुणे येथील आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेवराव भोसले, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाडवी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे बोलताना म्हणाले की प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी देखील वृत्तांकन करतांना ऐकीव माहितीबद्दल शहानिशा करून तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा करून दक्षतापुर्वक वृत्त द्यावे. गावाला पुढे नेण्यासाठी गावाची एकीच मदत करेल. आपला अशिक्षितपणा घालवण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग असून गावातील मुले डॉक्टर, इंजिनिअर व प्रशासकीय अधिकारी घडावे यासाठी प्रयत्न करावे. शासनातर्फे मुलांच्या शिक्षणासाठी आदिवासी आश्रमशाळा आहेत, तेथे मोफत प्रवेश, पुस्तके, जेवण व शाळेचे ड्रेस उपलब्ध होतात, त्याचा लाभ घेवून मुलांवर शैक्षणिक संस्कार घडविण्याकडे लक्ष द्यावे. गावातील रस्ते, वीज, पाणी, शाळा इत्यादी विषयांवर समस्या मांडून विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक ऊर्जा खर्ची घालण्याचे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी याप्रसंगी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ भुजबळ यांनी सांगितले की महिलांच्या नावासमोर आपले नाव जोडणाऱ्या व्यक्तीवर अॅस्ट्रासीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावाबाहेरच्या एका समाजकंटकाने फुस लावून गावातील एकोपा भंग करण्याचा प्रयत्न केला होता मात्र प्रशासनाने सत्य परिस्थिती लक्षात आणून दिल्यावर सर्व गावकरी एकत्र आले असून त्यांच्यातील एकोपा वाढला आहे.
गावात दोन दिवस महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून गावकऱ्यांना विविध प्रकारचे दाखले देण्यात आले. पोलीस व महसूल यंत्रणेने गावात तळ ठोकून गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक पावले उचलली. त्यांची अधिक उन्नती व्हावी यासाठी उन्नती पर्व नावाचे अभियान येथे सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजसेवक नामदेव भोसले यांनी पारधी समाज बांधवांनी दिशाभुल करणा-यांपासून सावध रहावे व अंधश्रद्धेला बळी न पडता आपल्या विवेक बुद्धीने निर्णय घ्यावा. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी देखील वृत्तांकन करतांना पारधी या जातीवाचक शब्दांचा उल्लेख टाळावा त्यामुळे पारधी समाजाची नाहक बदनामी टळेल, असे सांगितले.

यावेळी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, उपवनसंरक्षक अशोक सोनकुसरे यांनीदेखील विकासात्मक योजनांची माहिती दिली. ठाणेदार गुलाब चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप पाडवी, महसूल, वन व पोलिस विभागाचे अधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…