अखेर परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
परभणी :- गेल्या अनेक वर्षापासूनची परभणीकरांच्या हक्काची मागणी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राज्य शासनाने बुधवारी (ता.दोन) अखेर मंजुरी दिली. (Parbhani) परभणीकरांच्या जनआंदोलनाचे हे मोठे यश मानले जात आहे.
परभणी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी परभणीचे खासदार संजय जाधव (Marathwada) यांच्या नेतृत्वाखाली दोन वेगवेगळ्या टप्प्यात जनआंदोलन करण्यात आले होते.
सुरुवातीच्या टप्प्यात सर्वसामान्य नागरीक, विद्यार्थी, महिला, डॉक्टर, वकील यांनी जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो विद्यार्थ्यांचा मोर्चा ही काढण्यात आला होता. त्यानंतर जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी सलग आठ दिवस धरणे आंदोलन केले होते. आंदोलन सुरु असतांनाच राज्य सरकारने पीपीपी धोरणाची घोषणा केली होती.
त्यामुळे परभणीकरांमध्ये संभ्रामावस्था निर्माण झाली होती. त्यामुळे जाधव यांनी प्राणांतिक उपोषणाचा इशारा देखील दिला होता. परंतू त्याच वेळी १ मे रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असतांना परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली होती. त्यामुळे परत परभणीकरांच्या आशा उंचावल्या होत्या. त्यानंतर शासकीय स्तरावरून मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या. एका उच्चस्तरीय समितीनेही शासकीय रुग्णालायाच्या उभारणी संदर्भात परभणी येथे भेट देवून पाहणी केली होती.
अखेर बुधवारी (ता.दोन) परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी देण्यात आल्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. परभणीकर संघर्ष समितीच्यावतीने ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी खासदार डॉ. फौजिया खान व माजी आमदार अॅड. विजयराव गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली वारंवार राज्यातील जेष्ठ नेत्यांच्या भेटी घेवून पाठपुरावा केला होता. जेष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या भेटी घेवून जोर वाढविला होता. त्याचाही सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले.
सर्व परभणीकरांच्या मागणीला यश आले आहे. हा जनआंदोलनाचा विजय आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा आमचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आता परभणीकरांना उत्तम आरोग्य सेवा पुरविल्या जातील, असा विश्वास या निमित्ताने खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केला. तर काॅंग्रेसचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांनी या निर्णयाची माहिती ट्विटद्वारे देत परभणीकरांना खुषखबर दिली.
महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय उभारण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे परभणीकरांची जुनी मागणी पूर्ण झाली असून, काँग्रेसचा परभणी जिल्ह्याचा संपर्क मंत्री या नात्याने मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्रिमंडळाचा आभारी आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयानुसार परभणी येथे पुढील ४ वर्षात ६८२ कोटी रूपये खर्च करून १०० प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व ४०३ खाटांचे संलग्नित रुग्णालय उभारले जाईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण तर नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होईल, असे चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….