झरी जामणी तालुक्यात विकास कामे वाढविण्यावर भर द्या :- पालकमंत्री संदिपान भुमरे ; रस्ते व पाणीपुरवठा ची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि.15 : झरी जामणी या आदिवासी तालुक्यातील नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा व शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने या तालुक्यातील विकास कामे वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे. तसेच येथील रस्त्यांची व पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज दिलेत.
झरी तहसील येथे आज पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी भेट देऊन तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सहायक जिल्हाधिकारी विवेक जाॅनसन, माजी आमदार विश्वास नांदेकर, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, जिल्हा. खनिकर्म अधिकारी ओंकार सिंह भोंड, तहसीलदार जी.एम. जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना, पालकमंत्री यांनी झरी ते पाटण रस्त्याचे काम मागील दीड वर्षापासून अद्याप पूर्ण का झाले नाही याबाबत विचारणा केली. येथे मजूर संख्या वाढवून काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत.
झरी तालुक्यात विहिरींची कामे , रोजगार हमी योजनेत कुशल अकुशल कामावर मजूर उपस्थिती, शासकीय योजनेतून गुरांचे गोठे बांधकाम, शाळांचे इमारत बांधकाम, पांदन रस्त्यांची कामे इत्यादी विकास कामाचा आढावा घेतला.
या तालुक्यातील विकास कामे राबविण्यासाठी पुरेशी यंत्रणा आहे का, तहसील नगरपंचायत व इतर यंत्रणेला काय अडचणी आहेत याबाबत सुद्धा पालकमंत्री यांनी सत्य परिस्थिती जाणून घेतली.
झरी, जामणी, सालेभट्टी व दुर्गापूर व लगतच्या भागातील उन्हाळ्यातील पाणी टंचाईची परिस्थिती बघता पाण्याचा चांगला स्रोत शोधून पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
झरी येथे क्रीडासंकुलासाठी शासकीय जागा अथवा खाजगी जागा घेऊन क्रीडा संकुलाचे काम सुरू करण्याची चाचपणी करण्यासही त्यांनी सांगितले. शेततळे, सार्वजनिक विहिरी, पशुसंवर्धनाची कामे वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
पालकमंत्री यांनी आज चीचघाट येथील शासकीय आश्रम शाळा व शाळेच्या क्रीडा संकुलाच्या कामकाजाची पाहणी केली. तसेच मुकुटबन येथील आरसीसीपीएल या बिर्ला गृपच्या सिमेंट कंपनीत भेट दिली.
झरी येथील बैठकीला तहसील, नगरपंचायत, कृषी, वनविभाग, आरोग्य व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..