हिंगणघाट अंकिता जळीतकांडात विकेश नगराळेला मरेपर्यंत जन्मठेप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगणघाट :- येथील प्रा. अंकिता जळीतकांडातील दोषी विकेश ऊर्फ विकी नगराळे याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
त्याच प्रमाणे आतापर्यंत त्याने भोगलेल्या तुरुंगवासाला या शिक्षेतून सूट मिळणार नाही, असा निकाल न्यायाधीश राहुल भागवत यांनी दिला. आरोपी विकेशला काल खुनाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरविले होते.
सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल भागवत यांच्या समोर सुनावणीला सुरवात झाली. दुपारपर्यंत सरकारी पक्ष आणि बचाव पक्ष युक्तिवाद चालला. त्यानंतर साडेचार वाजता प्रत्यक्षात न्यायाधीश भागवत यांनी दोन्ही पक्षाच्या वकिलांना बोलावून आरोपीला शिक्षा सुनावली. आरोपीचे क्रौर्य व क्रूरता पाहून त्याला त्याने आतापर्यंत भोगलेल्या शिक्षेत सूट देण्यात आली नाही. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश भागवत यांनी १५० पानांचे निकालपत्र दिले आहे.
सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी आज न्यायालयासमोर युक्तिवाद करताना मृत्युदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध खटल्यांचे दाखले दिले. तर बचाव पक्षाचे अॅड. भूपेंद्र सोने यांनी या प्रकरणाचा प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) संदिग्ध असल्याने शिक्षा देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद केला. प्रा. अंकिता कॉलेजमध्ये जात असताना हिंगणघाटातील नंदोरी चौकात आरोपी विकेश नगराळे याने तिला पाठीमागून येऊन गाठले व तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळले होते.
विकेश नगराळेला मरेपर्यंत जन्मठेप
गंभीर जळालेल्या अवस्थेत तिला नागपुरात एका खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथेच आठ दिवसांनंतर, १० फेब्रुवारी २०२०रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. या बहुचर्चित प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर तसेच दारोडा गावात पोलिसांचा बंदोबस्त होता. प्रा. अंकिता हिची आई संगीता आणि वडील अरुण पिसुड्डे हे आज न्यायालयात उपस्थित होते.
निकमांनी मागितला मृत्युदंड
गुन्हा सिद्ध झाल्यानंतर सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या युक्तिवादात सदर प्रकरण हे ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ या प्रकारातले आहे. त्यामुळे आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी केली.
यावेळी त्यांनी आरोपीने दिलेल्या खुनाच्या धमकीचाही उल्लेख केला. याकरिता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचाही दाखला दिला.
सोने म्हणाले एफआयआर संदिग्ध
आरोपीच्या वकिलांनी आज गुरुवारी न्यायालयात १४ मिनिटे युक्तिवाद केला. या युक्तिवादात त्यांनी पोलिसांचा एफआयआरच संदिग्ध असल्याचे म्हटले आहे. शिवाय त्यांनी या प्रकरणातील २९ साक्षीदारांवरही आक्षेप नोंदविला. एवढेच नाही तर पेट्रोल आणण्यासाठी वापरलेल्या शिशीवर आरोपीच्या बोटांचे ठसे नसल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. आरोपीला कमीतकमी शिक्षा देण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली.
आरोपी म्हणाला, मी तिथे नव्हतो
यावेळी आरोपी विकेशने आपले म्हणणे मांडले. घटनेच्या दिवशी माझी मुलगी सात दिवसांची होती. मी तिच्यासोबत होतो; घटनास्थळी नव्हतो. शिवाय मी घरात एकुलता एक असून सर्व जबाबदारी माझ्यावर आहे, असे आरोपीने न्यायालयात सांगितले.
दिवसभरात न्यायालयातील घटनाक्रम
दु. १०.५७ सरकारी वकील उज्वल निकम न्यायालयात पोहोचले.
१०.५७ आरोपी विकेश नगराळेला पोलिसांनी न्यायालयात आणले.
११.१० आरोपीचे वकील अॅड. भूपेंद्र सोने पोहोचले.
११.१५ आरोपी विकेशची वकिलासोबत बाहेर चर्चा
११.१७ आरोपी आणि त्याचे वकील पुन्हा आत
११.२० अॅड. निकम यांचा युक्तिवाद सुरू.
११.५५ निकम यांचा युक्तिवाद संपला.
११.५६ अॅड. सोने यांचा युक्तिवाद सुरू.
१२.१० सोने यांचा युक्तिवाद संपला.
१२.१० पोलिस आरोपीला घेऊन रवाना
सायं. ५.०० मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा जाहीर.
अंकिताच्या मृत्युदिनीच शिक्षा
अंकिता पिसुड्डे हिचा नागपूर येथे उपचारादरम्यान १० फेब्रुवारी २०२० रोजी मृत्यू झाला. आज गुरुवारी तिच्या मृत्यूला दोन वर्षे पूर्ण झालेत. त्याच दिवशी तिला जाळणारा आरोपी विकेश नगराळे याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.
न्यायालयासमोर आम्ही आरोपीला मृत्युदंडाच्या शिक्षेची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
– अॅड. उज्वल निकम,विशेष सरकारी वकील.
माझ्या मुलीचा निर्घृण खून करण्यात आला. आरोपीला कठोर शिक्षा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, माननीय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही पूर्ण आदर करतो.
– संगीता व अरुण पिसुड्डे, अंकिताचे आईवडिल.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….