उमरखेड तत्कालीन नगराध्यक्ष तथा भाजपा आमदार नामदेव ससाणेसह ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
घनकचरा व्यवस्थापनातील गैरव्यवहार ! उमरखेड नगर परिषदेचा ६५ लाख रुपयाचा कचरा घोटाळा उघडकीस प्रकरण
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा संकलन व त्याची विल्हेवाट लावण्याच्या कामात गैरव्यवहार झाल्या प्रकरणी, अखेर सोमवारी(दि,७) उमरखेड पोलीसांनी तत्कालीन नगराध्यक्ष तथा विद्यमान भाजपा आमदार नामदेव ससाने यांच्यासह अकरा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट यामध्ये नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या कामांमध्ये नगरपरिषद अधिनियम ५८(२) अन्वये कार्योत्तर परवानगी घेऊन लाखोंची बिले काढल्याचा ठपका ठेवत तक्रार करण्यात आली होती. सदर तक्रारीवर तत्कालीन उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी प्रकरणाची शहानिशा करून जिल्हाधिकारी यांना कामात अनियमितता झाल्याचा अहवाल सादर केला होता. परंतु त्यावर ठोस कार्यवाही होत नव्हती. या बाबत तक्रारकर्त्याने यांनी अँड. अरमान अंबेजोगाईकर यांच्या मार्फत दोन वेळा उच्च न्यायलयाच्या नागपुर खंडपिठात धाव घेवुन कार्यवाहीची मागणी केली होती. न्यायलयाच्या बडग्याने नगर विकास मंत्रालयाने अखेर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून आज सोमवारी उशिरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांच्या फिर्यादीवरून उमरखेड पोलीसांनी ११ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला.
यामध्ये, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान आमदार नामदेव ससाने, तत्कालीन मुख्याधिकारी गणेश चव्हाण, कंत्राटदार गजानन मोहळे, फिरोजखान आजाद खान,( मॅकनिक) मजूर पुरवठादार पल्लवी इंटरप्राईजेस, नांदेड. तसेच माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक चंद्रशेखर जयस्वाल, तत्कालीन पाणीपुरवठा सभापती दिलीप सुरते, आरोग्य सभापती अमोल तिवरंगकर, महिला व बालकल्याण सभापती सविता पाचकोरे त्याच बरोबर, लेखापाल सुभाष भुते ,आरोग्य निरीक्षक विशाल श्रीवास्तव यांचा समावेश आहे.बनावट दस्ताऐवज तयार करून सुमारे ६५ लाख रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांचेवर ठेवण्यात आला आहे.याप्रकरणी उपलब्ध कागदपत्रांचा अभ्यास करून कार्यवाहीची पुढिल दिशा निश्चित केली जाईल अशी माहीती पोलीस प्रशासनाने , ‘ प्रसार माध्यमांना” दिली आहे.मुख्याधिकारी यांनी ६ फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर ठाणेदार यांनी दस्तऐवजाची पडताळणी सुरू करून आज (ता.७) फेब्रुवारी रोजी ४२०,४०९,४६५,४६७,४६८,४७१,३४नुसार कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.