बालेकिल्ल्यातच जयंत पाटील यांना रोखण्याची व्युहरचना ; इस्लामपूर मध्ये राजकीय संघर्ष वाढला ; विरोधक एकत्र…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सांगली :- विद्यमान सदस्यांची मुदत संपण्यास काही दिवसांचा अवधी राहिला असताना इस्लामपूर शहरातील राजकीय संघर्ष टोकाला गेला असून पालकमंत्री जयंत पाटील यांची कोंडी करण्याची व्यूहरचना भाजप आखत आहे.
यासाठी पाटील विरोधक एवढ्या एकच निकषाखाली सर्वांना एकत्रित घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला रोखण्याचे प्रयत्न होत आहेत.
मागील निवडणुकीवेळी थेट नगराध्यक्ष निवडीवेळी निशिकांत भोसले-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्व. विजय पाटील यांना पराभूत करून राज्याचे लक्ष वेधले होते. राष्ट्रवादीची तीन दशकांची एकहाती सत्ता मोडीत काढण्यात विकास आघाडीला यश आले होते, मात्र, उपनगराध्यक्ष निवडीमध्ये एका अपक्षाला घेऊन सत्तेत सहभाग मिळविण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली असली तरी लोकांनी नाकारले होते हेही स्पष्ट होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे गृहक्षेत्र म्हणून उरण-इस्लामपूर ही नगरपालिका ओळखली जाते. मागील पाच वर्षांचा कार्यकाल सोडला तर तीन दशकांहून अधिक काळ जयंत पाटील सांगतील ती पूर्व दिशा अशीच या शहराची राजकीय स्थिती होती. मात्र तत्कालीन युती सरकारच्या र्पांठब्यामुळे जयंत पाटील यांच्या विरोधकांना एकत्रित येण्यास सुरुवात झाली. पेठचे नाना महाडिक, शिराळ्याचे शिवाजीराव नाईक, आमदार सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी एकत्रित येऊन जयंत पाटलांना पर्याय म्हणून विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविली. याचे परिणाम म्हणून थेट नगराध्यक्ष निवडीमध्ये आघाडीने बाजी मारत राष्ट्रवादीचा पराभव करीत निशिकांत पाटील नगराध्यक्षपदी विराजमान झाले. २८ सदस्यांच्या सभागृहामध्ये आघाडीचे १३, राष्ट्रवादीचे १४ तर अपक्ष एक असे सदस्य निवडून आले. अपक्ष दादासाहेब पाटील यांना थेट उपनगराध्यक्ष पदाची संधी देत राष्ट्रवादीने सत्तेतील भागीदारी कायम राखत निर्णय प्रकियेतील सहभाग कायम राखला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात मंजूर असलेली भुयारी गटार योजना निधीअभावी दोन दशके रखडली होती. मात्र, युती सरकारच्या काळात सुमारे ७० कोटींची योजना मार्गी लागली. करोना संकट असो वा राजकीय अडथळे असोत, यामुळे ही योजना निधी असूनही रखडली आहे. योजना रखडल्यामुळे शहरातील अनेक रस्ते उकरले असल्याने त्याचा नाहक त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे. याचबरोबर योजना पूर्ण झाल्यानंतर रस्ते करायचे असे ठरविले गेल्याने वाडीवस्तीवरील रस्त्यापेक्षा भयाण अवस्था सर्वच रस्त्यांची झाली आहे.
विकास आघाडीमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस यांचा प्रामुख्याने समावेश असून आघाडीचे अध्यक्षपद भाजपचे विक्रम पाटील आणि उपाध्यक्षपद काँग्रेसचे वैभव पवार यांच्याकडे आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार हेही इस्लामपूरचेच असल्याने राज्यात राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून पंगतीला असलेली सेना या ठिकाणी राष्ट्रवादीची विरोधक आहे. आता जिल्हयाचे पालकत्व असलेले जयंत पाटील यांची सत्तेवरील मांड ही विरोधकातील ऐक्याचा अभाव हीच होती.
नामांतराचा वाद.इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर करण्याची आग्रही मागणी शिवसेनेने केली आहे. या मागणीवर सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे मौन असले तरी वंचित बहुजन विकास आघाडीने नामांतराला विरोध केला आहे. विकास आघाडीने यासाठी आंदोलनाची तयारीही सुरू केली आहे. मुळात इस्लामपूरच्या नावात उरण हे नाव आहे. उरणा देवीच्या नावावरून हे नाव असले तरी त्याचा रोजच्या व्यवहारात अभावानेच वापर होत असल्याचे दिसते. नामांतर ही राष्ट्रवादीची दुखरी नस असल्याने येत्या निवडणुकीमध्ये नामांतराचा मुद्दा अधिक टोकदार झाल्यास नवल वाटणार नाही.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..