अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होणार नाही यासाठी सतर्क रहा :- जिल्हाधिकारी विकास मीना ; बालविवाह होतांना आढळल्यास संबंधित सर्वांवर कारवाई करा ; अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि.25 :- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सामुदायिक व एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. या मुहुर्तावर बालविवाह होण्याची शक्यता असते. जिल्ह्यात कुठेही या दिवशी बालविवाह होता कामा नये. बालविवाहाचा प्रयत्न झाल्यास सर्व संबंधितांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावे, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले.
महसूल भवन येथे याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह दुरदृश्य प्रणालिद्वारे सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. येत्या 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवशी होणाऱ्या सर्व विवाहांची माहिती दि.28 एप्रिल पर्यंत सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
ग्रामस्तरावर ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांच्या मदतीने गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देण्याचे नियोजन करावे. या दिवशी गावात कोठे, आणि किती लग्न होत आहे. त्यातील वधु व वर कायदेशीर वय धारण करणारे आहेत का? याची माहिती घेतल्या जावी. यासाठी सर्व संबंधितांचे नावासह आदेश काढण्यात यावे. बालविवाह लावल्यास आणि विवाहास मदत करणाऱ्यास कायदेशीर कोणती कार्यवाही केल्या जावू शकते, याची माहिती सर्व संबंधितांना देण्यात यावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
ग्रामस्तरीय समितीला लेखी पत्र देऊन गावात बालविवाह होणार नाही, याची दक्षता घेण्याचे सूचित करावे. कुठेही बालविवाह होत असल्याचे किंवा वधु वर विहीत वयाचे नसल्यास नागरिकांनी 112 किंवा 1098 या हेल्पलाईनवर संपर्क साधून माहिती द्यावे, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल, असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी बालविवाह होणार नाही, याची सतर्क रहावे, यात हयगय केल्यास कारवाई करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
बालविवाह ही अत्यंत अनिष्ट प्रथा आहे. ही प्रथा समूळ नाहीसी होणे आवश्यक आहे. अज्ञानातून किंवा गरिबीमुळे किंवा विवाहावर होणारा खर्च वाचविण्यासाठी असे विवाह होतांना दिसतात. त्यामुळे असे विवाह किती घातक आहे, याची माहिती देखील येत्या तीन दिवसात नागरिकांना देण्याचे काम करावे. बालविवाह ठरविणारे, विवाह सोहळा पार पाडणारे किंवा अशा विवाहास प्रोत्साहन देणारे सगळेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी ठरतात. त्यामुळे अशा सर्व व्यक्ती दोन वर्ष सक्तमजुरी, एक लाख रुपये दंड किंवा दोनही शिक्षेस पात्र ठरतात.