खरे जनाब नरेंद्र मियाँ मोदी अन् अमित मियाँ शहा, टीका करताना राऊत काय बोलून गेले?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “वक्फ दुरुस्ती विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही संसदेच्या सभागृहात मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हे विधेयक कायद्यात रुपांतरित होणार आहे. पण या दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी मत दिल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.
या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधलेला आहे. पण सत्ताधाऱ्यांच्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत प्रत्युत्तर देत आहेत. हेच प्रत्युत्तर देत असताना राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा मियाँ म्हणून उल्लेख केला आहे.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (ता. 5 एप्रिल) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंना सत्ताधारी जनाब म्हटल्याबाबत विचारणा करण्यात आली. याबाबत उत्तर देताना खासदार राऊत म्हणाले की, शिंदे गटाचे लोक शिकलेले लोक नाहीत. ते लोक शिकत नाहीत किंवा ऐकत नाहीत. त्यांनी माझे संसदेतील भाषण ऐकले पाहिजे. जे आम्हाला जनाब बोलत आहेत, त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, खरे जनाब हे अमित शहा आहेत. अमित मियाँ शहा आणि नरेंद्र मिया मोदी हे खरे जनाब आहेत. त्यांनी अमित शहांचे भाषण ऐकले पाहिजे होते, ते संसदेत बहिरे झाले होते का? असा टोला राऊतांनी लगावला आहे.
तर, सत्ताधाऱ्यांच्या भाषणावर टीका करताना राऊत म्हणाले की, इतकी वकिली, गरीब मुसलमानांची इतकी चिंता, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी सुद्धा त्यांच्या काळात मुसलमानांची इतकी वकिली केली नव्हती. यांना त्यांची इतकी चिंता व्यक्त केली की त्यांना वाटू लागले हेच त्यांचे मसिहा आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या व्यक्तीला वाटले की, बॅरिस्टर जिनांची जी आत्मा आहे, तीच यांच्या शरिरात घुसली की काय? त्याचमुळे हे त्यांची वकिली करत होते आणि हे लोक आम्हाला जनाब बोलणार? हे सत्ताधारी, शिंदे गटातील लोक सर्व जनाब मोदी आणि जनाब शहा यांचे चेले आहेत. हे चेले त्या जनाबांना घाबरून जगत आहेत. ईडीच्या भीतीने हे लोक त्यांना घाबरून जगत आहेत, कारण यांची फाइल अद्यापही बंद नाही झालेली, असेही यावेळी राऊतांनी म्हटले. तर आम्हाला या विधेयकावर जो निर्णय घ्यायचा होता, तो आम्ही घेतला आहे. त्यामुळे आमच्याकरिता ही फाइल बंद झाली असल्याचे राऊतांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.