उद्धव ठाकरे आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर धुळे , जळगाव धडकणार तोफ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी सभांचा धडाका लावला आहे. प्रत्येक पक्षाकडून महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेत आपल्या उमेदवारांचा प्रचार केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आज धुळे जळगाव दौऱ्यावर येणार आहेत.
आज दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे मुंबईकडून जळगावकडे रवाना होणार आहेत. दुपारी 3.45 वाजता जळगाव येथे त्यांचे आगमन होईल. दुपारी 3.45 वाजता जळगाव येथून हेलिकॉप्टरने उद्धव ठाकरे धुळ्याकडे रवाना होतील. 4.15 वाजता धुळे येथे त्यांचे आगमन होणार आहे.
धुळे-जळगावात ठाकरेंची तोफ धडाडणार
आज 4.30 वाजता धुळे लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. त्यानंतर 5.15 वाजता उद्धव ठाकरे जळगावकडे रवाना होतील. सायंकाळी 6.00 वाजता जळगावचे ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. या दोन्ही सभांमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धुळे-जळगावात अशी होणार लढत
दरम्यान, धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपने डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसने डॉ. शोभा बच्छाव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे धुळ्यात डॉ. सुभाष भामरे विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव यांच्यात लढत होणार आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून स्मिता वाघ आणि शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात लढत होणार आहे.