माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे महायुतीला विजयी करण्याचे निवेदन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- महाराष्ट्राचे माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघात महायुतीला विजय करण्याचे निवेदन प्रसिद्ध केले आहे त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की, बंधू-भगिनींना सप्रेम नमस्कार. मी यापुर्वीच्या सर्व निवडणुकीत प्रत्यक्ष सहभागी होवून आपणापर्यंत प्रत्यक्ष किंवा प्रचार सभेच्या माध्यमातून पोहोचत होतो आणि उमेदवारांचा प्रचार करीत होतो परंतु सध्या प्रकृती कारणास्तव मी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही याचा मला खेद आहे. १९५२ ला पहिली निवडणुक झाली तेव्हा माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक साहेब यांच्या प्रचारासाठी सायकलने पुसद मतदार संघातील गावांमध्ये दौरा केला आहे तेव्हापासून आतापर्यंत सर्व निवडणुकीत प्रचारासाठी सहभागी होत गेलो. यावेळेस प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही, याचे मला दुःख आहे. माजी मुख्यमंत्री कै. सुधाकरराव नाईक साहेब यांच्या प्रत्येक निवडणुकीची जबाबदारी मी समर्थपणे सांभाळली, जेष्ठ म्हणून त्यांनी घेतलेले सर्व निर्णय मी स्विकारले, अगदी राष्ट्रवादी निर्माण झाली तोही निर्णय मी स्विकारला आणि कामास लागलो.माझ्या प्रिय मतदार बंधू-भगिनी सोबत सर्व ठिकाणी जावून मी संवाद साधु शकत नाही याचा खेद मला आहे. तरीपण मी माझ्या निवासस्थानी दररोज शेकडो लोकांना भेटत असतो, त्यांची कामे करीत असतो. राष्ट्रवादी महायुतीत सहभागी असल्याने महायुतीच्या उमेदवाराला सहकार्य करुन निवडुन आणणे आपला युती धर्म आहे तो आपण पाळला पाहिजे. तुम्ही आतापर्यंत मला सहकार्य करीत आले मी पण माझ्या परीने आपली सेवा वैयक्तीक आणि सार्वजनिक पातळीवर करीत आलो आहे. कुणाच भलं जर माझ्याने करता आले नसेल तर वाईट मात्र मी कधीही केले नाही. कदाचित पुढील निवडणुकीत वयोमानामुळे माझा सक्रिय सहभाग राहु शकणार नाही.
मी आपणास विनंती करतो की, महायुतीचा धर्म पाळुन आपण सर्वजन येत्या दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सौ. राजश्री हेमंत पाटील यांच्या “धनुष्यबाण” या निवडणुक निशाणी समोरील बटन दाबुन त्यांना प्रचंड मतांनी निवडुन आणावे ही या पत्रकाव्दारे आपणास विनंती करीत आहे.