“मी संपादक आहे , मला मराठी शिकवू नका” ; नवनीत राणांच्या वक्तव्यावर संजय राऊत ठाम….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मी पत्रकार आहे. मी संपादक आहे. मला कोणी मराठी भाषा शिकवू नये, असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा भाजपच्या अमरावती मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा यांच्यावर पलटवार केला. तसेच, आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर डान्सर आणि बबली म्हणत टीका केली होती. त्यानंतर आज पुन्हा नटीला नटीच म्हणाणार ना, असं वक्तव्य केलं.
नेमकं प्रकरण काय?
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात नवनीत राणा यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी “अमरावतीत बळवंत वानखेडे यांचा लढा नर्तकीशी नाही तर, देशासाठी लढा आहे. बळवंत वानखेडे विरुद्ध नाचनेवाली, डान्सर, बबली नसून मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी लढत आहे. मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, मोदी विरुद्ध शरद पवार आणि मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही लढत असल्याचे संजय राऊत म्हणाले. तसेच, मातोश्री आणि हिंदुत्वाबद्दल अपशब्द ज्या महिलेने वापरले त्या महिलेचा पराभवं करणे हे शिवसैनिकांचे पहिले आणि नैतिक कर्तव्य असल्याचेही राऊत म्हणाले.
त्यानंतर आज संजय राऊत यांची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. त्या बैठकीवेळी अनौपचारिक गप्पांमध्ये राऊतांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा विषय निघाला. त्यावेळी केलेल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देताना “नटीला नटी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं. इंग्लिश शब्द अवघड आहे. इंग्लिश शब्द एक्ट्रेक म्हणताय ते नाही”, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.
संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर बैठकीला उपस्थित असलेल्या जयंत पाटील यांनी या चर्चेवर वक्तव्य केले. ‘नाच्या, नाची हे मराठी शब्द आहेत’, असे जयंत पाटील म्हणाले. त्यावर ‘ती डान्सर आहे. आपण गणपत पाटील यांना प्रेमाने नाच्या म्हणत होतो’, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. दरम्यान, संजय राऊतांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
या वक्तव्यावरून खासदार संजय राऊतांना माध्यमांनी प्रश्न विचारला त्यावर उत्तर देताना संजय म्हणाले की, “मी संविधानिक शब्दांचाच उल्लेख करतो. मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको. ती मला माहिती आहे. मी 40 वर्ष बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलाला माणूस आहे. मी पत्रकार आहे. मी संपादक आहे. मला कोणी मराठी भाषा शिकवू नये”, असे वक्तव्य त्यांनी केले.
कंगणाबद्दलही वापरला होता आक्षेपार्ह शब्द
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर टीका केली होती. कंगना राणावतला हरामखोर म्हणत टीका केली होती. त्यानंतर संजय राऊत यांच्यावर चौफेर टीका झाली. त्यानंतर सारवासारव करत ‘मला कंगनाला हरामखोर म्हणायचे नव्हते. तिला नॉटी गर्ल म्हणायचे होते. पण माझ्या म्हणण्याचा भलताच अर्थ लावला गेला’, असे संजय राऊत म्हणाले होते.