ठाकरे गटातल्या आणखी एका आमदाराचा शिवसेनेत प्रवेश ; मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर सडकून टीका…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पाडवींचं पक्षामध्ये स्वागत केलं.
शिवाय उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
”५० आमदार, १३ खासदार, विधान परिषदेचे ६ आमदार, विधान परिषदेच्या उपसभापती आपल्यासोबत आहेत. सरपंच, नगरसेवक हजारो कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत.” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची ताकत वाढत असल्याचं नमूद केलं.
एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, २०१९ मध्ये आपण लोकसभा आणि विधानसभा लढवल्या त्यावेळी एकीकडे स्व. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींचा फोटो होता. परंतु निकाल लागल्यानंतर पक्षप्रमुखांनी वेगळा निर्णय घेतला. त्यामुळे सगळेच नाराज झाले होते. लग्न एकाबरोबर आणि संसार दुसऱ्याबरोबर, असं राजकारणात चालत नाही. राजकारणात बुद्धीमत्ता, विचारधारा पाळावी लागते.
”त्यामुळे आम्ही शिवसेनेचं खच्चीकरण रोखण्यासाठी वेगळा निर्णय घेतला. एखाद्या प्रमुखांनी चुकीचं पाऊल उचललं तर त्यांना जाब विचारण्याची संधी लोकशाहीने दिलेली आहे. त्यामुळे अति झाल्यानंतर आम्ही निर्णय घेतला आणि बाळासाहेबाची खरी शिवसेना टिकवली.” असं शिंदे म्हणाले.
पाडवी यांचं काम मोठं आहे- शिंदे
”पाडवी आपण सोबत आलात ही मोठी गाोष्ट आहेत. नंदूरबारसारख्या दुर्गम भागात पाडवी चांगलं काम करत आहेत. आज एवढी लोकं इथं जमली आहेत, त्याचं कारण आमदार आमश्या पाडवींची लोकप्रियता.”
शिंदे पुढे म्हणाले, जे लोक आम्हाला कचरा म्हणत होते, त्यांच्याकडे नियती बघून घेत आहे. महाराष्ट्रात ज्या-ज्या ठिकाणी आम्ही जात आहोत तिथे लोक मोठ्या संख्येने आमच्यासोबत असल्याचं दिसतं. हे चित्र बघितल्यानंतर आम्ही योग्य निर्णय घेतल्याचं लक्षात येतंय. शेतकऱ्यांसाठी आम्ही सगळे नियम बदलून टाकले आहेत. शेतकऱ्यांसाठी २५ हजार कोटी रुपये सरकारने खर्चे केले आहेत. आता तर प्रत्येकाच्या नावाच्या पुढे आईचं नाव देण्याचा सरकारने घेतला आहे. महिलाचा गौरव करणारं हे सरकार आहे, असं म्हणत शिंदेंनी केलेल्या कामाची माहिती दिली.