तिघांपैकी दोघांचे मृतदेह सापडले, वणी येथील वर्धा नदीत बुडालेल्या एका तरुणाचा शोध सुरूच….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वणी :- देवदर्शन करून घरी परत येत असताना वर्धा नदीत पोहण्याचा आनंद घेणे येथील तीन तरुणांच्या जिवावर बेतले. शोध पथकाला नदी बुडालेल्या दोन तरुणांचा मृतदेह शोधण्यात यश आले.
एकाचा शोध सुरू आहे. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता.८) घडली होती.
वणी शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील दहा ते १२ तरुण चंद्रपूर जिल्ह्यातील भाटाळी येथील पुरातन शिवमंदिरात दर्शनासाठी गेले होते. यामध्ये संकेत नगराळे (वय १९), अनिरुद्ध चापले (वय १९) व हर्ष चापले (वय १८) यांचाही समावेश होता. देवदर्शन करून ते वणी शहराकडे येण्यासाठी निघाले.
वाटेत असलेल्या वर्धा नदीत पोहण्याचा मोह या तरुणांना झाल्याने तरुण नदीपात्रात उतरले. हर्ष पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाताना दिसला. म्हणून अनिरुद्ध व संकेतने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीनही मुले नदीपात्रात बुडाल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
ही बातमी वणी शहरात कळताच अनेकांनी नदीच्या दिशेने धाव घेतली. मात्र, दिवस मावळल्याने शोध मोहीम राबविता आली नाही. आज शनिवारी सकाळी चंद्रपूर येथील बचाव पथकाने बोटीच्या सहायाने नदीपात्रात शोध सुरू केला. त्यात अनिरुद्ध चापले व संकेत नगराळे या दोघांचे मृतदेह शोधपथकाच्या हाती लागले आहे. दरम्यान, हर्ष चापले याचा शोध सुरू आहे. मिळालेल्या दोन तरुणांचे मृतदेह वणी येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले आहेत.