राहुल गांधींचे श्रीकृष्णाच्या रुपातील पोस्टर झळकले ; उत्तर प्रदेशातील बॅनरमुळे वाद उफाळण्याची शक्यता….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांची न्याय यात्रा सुरु आहे. ही यात्रा कानपूरमध्ये पोहोचण्यापूर्वी एक वादग्रस्त पोस्टर झळकले आहे. त्यामध्ये राहुल गांधींना कृष्णाच्या अवतारात दाखवण्यात आलेय.
बुधवारी भारत जोडो न्याय यात्रा कानपूरला पोहोचण्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘भगवान कृष्ण’ आणि यूपी काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांना ‘अर्जुन’ दाखवणारे पोस्टर लावले आहेत. या पोस्टर्समुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य संदीप शुक्ला हे नाव आणि फोटो पोस्टवर झळकत आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा कानपूरमध्ये दाखल होत आहे. त्यापूर्वीच हे पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झाले आहे.
उत्तर प्रदेशातील राजकीय परिस्थिती काय?
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने काँग्रेसला सतरा जागा देण्याची तयारी दर्शविली असून काँग्रेसने हा प्रस्ताव स्वीकारला तरच पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले, ‘आम्ही काँग्रेसला सतरा जागांचा अंतिम प्रस्ताव सादर केला असून त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला तरच अखिलेश यादव हे रायबरेलीत न्याय यात्रेत सहभागी होतील.’ दरम्यान काँग्रेसला नेमक्या कोणत्या जागा सोडण्यात आल्या आहेत? याची माहिती उघड करण्यास मात्र चौधरी यांनी नकार दिला.