सर्व त्रुटी दूर करून आरक्षण दिलं :- अजित पवार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी, निमसरकारी नोकरीत 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक मंगळवारी (20 फेब्रुवारी) विधिमंडळात एकमताने चर्चेविना संमत करण्यात आले. हे आरक्षण सर्व त्रुटी दूर करुन आरक्षण दिलं असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.
राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी, निमसरकारी नोकरीत 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक मंगळवारी विधिमंडळात एकमताने चर्चेविना संमत करण्यात आले. आरक्षण देताना राज्य सरकारने वार्षिक उत्पन्नाची अट घातली आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती उन्नत तसेच प्रगत गटात मोडणाऱ्या नाहीत, अशा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील व्यक्तींना या अधिनियमाखाली आरक्षण उपलब्ध असेल, असे विधेयकात स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंदर्भात शासकीय राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभरात मराठा आरक्षण लागू होईल. राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन आयोजित केले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले. या अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देणारे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठीचे आरक्षण विधेयक मांडले. या आरक्षणाच्या संदर्भात शिंदे यांनी सरकारची भूमिका मांडल्यानंतर विधेयक चर्चेविना एकमताने संमत करण्यात आले.
ज्यांनी हातभार लावला त्यांचे आभार
मराठा आरक्षणाचे विधेयक दोन्ही सभागृहात एकमताने संमत झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसमोर येत त्यांची प्रतिक्रिया दिल्या. मात्र, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार दिसले नाही. दरम्यान काही वेळापूर्वीच अजित पवारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर ट्वीट करत मराठा आरक्षणा संदर्भात पोस्ट करत सर्वांचे आभार मानले. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, शिक्षणात आणि रोजगारात 10 टक्के आरक्षण देण्याचं मराठा आरक्षण विधेयक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर करण्यात आलं, ही अतिशय आनंदाची बाब आहे. विशेष म्हणजे सर्व त्रुटी दूर करून हे आरक्षण देण्यात आलं आहे. मराठा समाजाचं मनापासून अभिनंदन करतो. हे आरक्षण मंजूर करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे आभार! असे लिहित त्यांनी सर्वांचेच आभार मानले.