लोकसभा 2024 निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत जाणार..? असदुद्दीन ओवेसी यांनी दिलं उत्तर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- लोकसभा 2024 ची निवडणूक तोंडावर आल्याने सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन नेते असदुद्दीन ओवेसी औरंगाबाद मध्ये आले होते.
औरंगाबाद मध्ये एमआयएमचा एक खासदार आहे. मागच्या निवडणुकीत एमआयएमने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली होती. यावेळी ते कोणासोबत जाणार या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं आहे.
यावेळी एमआयएम कोणासोबत जाणार?
एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले, की निवडणुकीसाठी आमची तयारी सुरू आहे. येथील जनता पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांना खासदार बनवतील. या अगोदरच्या खासदाराने काहीच केलं नव्हतं. मात्र, इम्तियाज जलील यांनी काम करून दाखवलं असल्याचं ओवेसी यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेससोबत जायचे की नाही हे खासदार इम्तियाज जलील सांगतील ते त्यांनाच विचारा. लोकसभेत कुणासोबत जाणार यावर ओवेसी यांच्याकडून स्पष्ट उत्तर देण्यात आले नाही.
मागच्यावेळी वंचितसोबत..
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने आघाडी करुन निवडणूक लढवली होती. मात्र, राज्यात वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर फारसा चालला नसल्याचं पाहायला मिळालं. या आघाडीनं सर्वच्या सर्व 48 जागांवर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. पण अपेक्षेनुसार वंचित बहुजन आघाडी राज्यात आपला करिष्मा दाखवण्यात कमी पडली. तसंच ‘वं.ब.आ.’मुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त फटकादेखील बसल्याचं दिसलं. शिवाय, प्रकाश आंबेडकर स्वतःदेखील सोलापूर आणि अकोला लोकसभा मतदारसंघातून विजयी होऊ शकले नाहीत. यात एमआयएमचा एक खासदार तेवढा निवडणूक आला होता.
शिवसेना आमदार अपात्र निकालावर आश्चर्य
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर ओवेसी यांनी आश्चर्य व्यक्त केलं. अध्यक्षांचा निर्णय मला आश्चर्यकारक वाटला. संविधानातील आर्टिकल 10 विसरून गेले, असाही आरोप असदुद्दीन ओवेसी यांनी केला. महाराष्ट्राच्या राजकारणाला जनता पाहत आहे. लोक कसे स्वतःचे कपडे काढून दुसरे कपडे घालत आहे. वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालत आहे. मात्र, आमचा एकच कलर आहे, अशी टिपण्णी महाराष्ट्राच्या राजकारणावर असदुद्दीन ओवेसी यांनी केली.