मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला..! CM शिंदे आज मोठी घोषणा करणार…? ‘वर्षा’वर रात्री काय घडलं..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने बैठका होत आहेत.
मंत्रीमंडळ विस्तार आणि खाते वाटपासंदर्भात या बैठका होत असल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी रात्री देखील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी बैठक झाली.
या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित होते. जवळपास दोन तास सुरू असलेल्या या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत अंतिम चर्चा झाल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) आणि खातेवाटपाबाबत तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठी घोषणा करण्याची शक्यता असून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो.
दरम्यान, मंत्रीपदासाठी भाजपसह शिंदे गटाच्या (Eknath Shinde) अनेक इच्छुक आमदारांनी देव पाण्यात ठेवले असून, कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. एकीकडे अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली असली, तरी अजून त्यांना खातेवाटप झाले नाही.
आता तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरच खातेवाटप होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांच्या गटाकडून विशिष्ठ खात्यांचा आग्रह धरला जात आहे. अर्थ, ग्रामविकास, सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला आणि बालविकास, आणि अल्पसंख्याक खाती राष्ट्रवादीला हवी आहेत. मात्र अर्थ खातं अजित पवारांना देण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.