काका-पुतण्याच्या संघर्षात नव्या पवारांची एण्ट्री, कोण आहे युगेंद्र पवार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. या फुटीनंतर आता पवार कुटुंबामध्ये भेटीगाठी व्हायला सुरूवात झाली आहे.
सोमवारी रात्री उशीरा अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यानंतर अजित पवार मंगळवारी राष्ट्रवादीच्या कोणत्याच नेत्याला भेटले नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट न घेता अजित पवार त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांची भेट घेण्यासाठी गेले. 2019 साली देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली तेव्हाही अजित पवार मुंबईमध्ये श्रीनिवास पवार यांच्या घरीच होते.
एकीकडे अजित पवार श्रीनिवास पवार यांच्याकडे गेले असताना दुसरीकडे श्रीनिवास पवार यांचे पूत्र युगेंद्र पवार हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी वाय.बी.चव्हाण सेंटरला गेले होते.
महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर या कौटुंबिक भेटीगाठींची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे. युगेंद्र पवार हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी का गेले होते? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
श्रीनिवास पवार हे काल रात्री परदेशामधून आले, त्यानंतर लगेचच सकाळी जाऊन अजित पवारांनी त्यांची भेट घेतली आहे.