आसाराम यांच्या बायको आणि मुलीलाही होणार शिक्षा…? गुजरात उच्च न्यायालयाने बजावली नोटीस….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
गांधीनगर :- गुजरात उच्च न्यायालयाने २०१३मध्ये बलात्काराच्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलेल्या बाबा आसाराम यांच्या बायको, मुलगी आणि तीन महिला शिष्यांना नोटिस बजावली आहे.
या महिलांची आधी मुक्तता करण्यात आली होती, तसेच आसाराम यांना आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती हसमुख सुथार यांच्या विभागीय बेंचने आसाराम यांची बायको लक्ष्मीबेन आणि मुलगी भारतीबेन यांच्यासह एकूण पाच महिलांना नोटिस पाठवली आहे. न्यायालयाने अपील दाखल करण्यात झालेल्या २९ दिवसांच्या उशीराची नोंद घेतली आणि बचावपक्षाला नोटिस बजावली.
गांधीनगरच्या एका न्यायालयाने २०१३मध्ये एका महिला शिष्याने दाखल केलेल्या बलात्काराच्या आरोपाखाली ३१ जानेवारी या दिवशी बाबा आसाराम यांना आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. महिला शिष्या पळून जाण्याआधी अहमदाबाद जवळील मोटेरा येथील आसाराम यांच्या आश्रमात २००१ ते २००७ या काळात अनेक वेळा बलात्कार करण्यात आला होता.
आसाराम यांची पत्नी लक्ष्मीबेन, मुलगी भारतीबेन आणि अन्य सहा शिष्यांवर गुन्ह्यात मदत करणे आणि प्रवृत्त करण्याचे आरोप होते. न्यायालयाने पुराव्यांच्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.
राज्यातील कायदे विभागाने ६ मे २०२३ला फिर्यादी पक्षाला निर्दोष मुक्तता झालेल्यांविरोधात अपील दाखल करण्याचे निर्देश दिले होते. निर्दोष मुक्तता झालेल्या ६ लोकांपैकी ५ लोकांविरुद्ध अपील दाखल करण्यात आली आहे.
८१ वर्षीय आसाराम २०१३मध्ये त्यांच्या आश्रमातील अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि दुसऱ्या एका प्रकरणात जोधपूर. येथील कारागृहात शिक्षा भोगत आहेत.