शनिवार ठरला ‘अपघात’वार..! ५ मोठे अपघात, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. समृद्धी महामार्गावरील अपघाताने तर हाहाकार माजवला आहे. शनिवार हा ‘अपघात’वार ठरला असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही, शनिवारची सकाळ समृद्धी महामार्गावरील अपघाताने झाली.
आज अनेक अपघात झाले. या अपघातांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. कोपरगाव, बुलढाणा, अक्कलकोट, अकोला, पुणे-सोलापूर महामार्गावर मोठे अपघात झाले आहेत.
२५ जणांचा मृत्यू –
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराजवळ झालेल्या भीषण बस अपघातात २५ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. समृद्धी एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला. येथे विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. अपघातानंतर बसने पेट घेतला. काही वेळातच बसला आग लागली. लोकांना काही समजेपर्यंत २५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
बसमध्ये एकूण ३३ लोक होते, त्यापैकी ३ निष्पाप मुलांसह २५ जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी ८ जण गंभीर जखमी झाले. समृद्धी द्रुतगती मार्गावर जाणाऱ्या बसचा टायर फुटला, त्यानंतर ती खांबाला आणि दुभाजकाला धडकली. यानंतर तो वळला असता आग लागली, अशी माहिती मिळत आहेत.
क्रूझर जीपला बल्करची समोरासमोर धडक, सहाजण ठार –
अक्कलकोट: क्रूझर जीपला बल्करची समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात आज सहाजण ठार तर दहा जखमी झाले. हा अपघात अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडीपासून दोन किलोमीटर अंतरावर अक्कलकोट-वागदरी रस्त्यावर झाला. मृतांमध्ये पाच महिलांसह एका मुलाचा समावेश आहे.
दर्यापूर-अकोट मार्गे पुणे करता जाणारी लक्झरी बस पलटी-
अकोला- दर्यापूर-अकोट मार्गे पुणे करता जाणारी लक्झरी बस देवरी-शेगाव मार्गावरील हनवाडी फाट्यानजीक रात्री सुमारे सव्वा सातच्या सुमारास पलटी झाली. त्यामध्ये २६ प्रवासी जखमी झाले असून, दहाच्या वर गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
जखमींवर अकोल्यातील खाजगी व जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. काही गंभीर रुग्णांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
पंधरा दिवस पंढरीची वारी… घरापासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर अपघात अन् –
पुणे सोलापूर महामार्गावर एका ६५ वर्षीय वारकरी महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा येथे काल (शुक्रवारी) दुपारी हा अपघात झाला आहे.
दगडाबाई बाळू खुपसे (६५) असे अपघातात मृत्यू झालेल्या वारकरी महिलेचे नाव आहे. तर नाना सुखदेव कावरे (३५) असे ट्रक चालकाचे नाव आहे.
समृद्धी महामार्गावर टेम्पोला कारची मागून धडक –
समृद्धी महामार्गावर टेम्पोला कारने मागून धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीसह दीड वर्षाची मुलगी ठार झाली. अपघातात इतर सहा जण जखमी झाले आहेत. पती व चिमुकली जागेवर मृत झाले, तर पत्नीचे उपचारादरम्यान निधन झाले. गुरुवारी (ता. ३०) मध्यरात्री एकच्या सुमारास अपघात झाला.