भाजपाचा मोठा निर्णय, मुंबईतील ‘आक्रोश आंदोलन’ स्थगित, कारण सांगत आशिष शेलार म्हणाले…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- बुलढाण्यात झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आज (१ जुलै) मुंबईत होणारे भाजपा आणि महायुतीचे ‘आक्रोश आंदोलन’ आज न करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली.
आशिष शेलार म्हणाले, “बुलढाण्यातील अत्यंत वेदना देणाऱ्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दु:खाचा डोंगर कोसळेल्या कुटुंबासोबत आमच्याही सहवेदना! स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांनी सुध्दा शोकभावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळी पोहचत आहेत.”
“.म्हणून आज ‘आक्रोश आंदोलन’ न करण्याचा निर्णय”
“या संपूर्ण घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज होणारे भाजपा आणि महायुतीचे ‘आक्रोश आंदोलन’ आज न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आजचा दिवस दुःखाचा आहे, आज आम्ही काही बोलणार नाही, पण मुंबईकरांना लुटणाऱ्यांकडे हिशेब मात्र यापुढे ही मागतच राहू,” असं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं.