‘चोर मचाये शोर..!’ आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला महायुतीचे प्रत्युत्तर; शक्तिप्रदर्शन करत करणार विरोध….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- युवासेना अध्यक्ष तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली ठाकरे गट 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर भव्य मोर्चा काढणार आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या या मोर्चाला महायुती देखील जोरदारपणे प्रत्युत्तर देणार आहेत.
‘चोर मचाये शोर’चा नारा देत आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला भाजप-शिवसेना आणि आरपीआय महायुती प्रत्युत्तर देणार असल्याचे सांगण्यात येत आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या मोर्चा विरोधात भाजप युवा मोर्चाने रस्त्यावर उतरण्याची रणनिती आखली असून, या मोर्चात भाजपसोबत शिवसेना आणि आरपीआय देखील सहभागी होणार आहे. भाजपच्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयातून शनिवारी या मोर्चाला सुरुवात होणार आहे. ठाकरेंविरोधात महायुती रस्त्यावर उतरत शक्तिप्रदर्शन करणार आहे. मागील 25 वर्षात सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जो भ्रष्टाचार केला त्याची पोलखोल महायुती या प्रत्युत्तर मोर्चातून करणार आहे, असे भाजयुमोतर्फे सांगण्यात आलं आहे.
शिवसेना ठाकरे गट उद्या म्हणजेच 1 जुलैला मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेत्यांसह आदित्य ठाकरे करणार आहेत. या मोर्चाची घोषणा माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 20 जून रोजी केली होती. मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मुंबई मनपाच्या ठेवी म्हणजेच जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरु आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येईल असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
शिवसेना ठाकरे गटाच्या बीएमसीविरोधातल्या मोर्चाचा मार्ग बदलणार आहे. पोलिसांच्या सूचनेनंतर ठाकरे गटाकडून नव्या मार्गाच्या उल्लेखासह पत्र दिलं जाणार आहे. यापुर्वी कायदा आणि सुवेस्थेच्या प्रश्नावरुन या मार्गावरुन मोर्चाला परवानगी देण्यास अडथळे होत असल्याची बाब सांगत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर पोलीस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या चर्चेनंतर मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला आहे. या मोर्चाची परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटाने पुन्हा एकदा पोलिसांना पत्र दिलं आहे. त्यावर पोलीस निर्णय घेणार आहेत.