राज्यात 1 लाख 20 हजार रोजगारांची होणार निर्मिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात पुणे, औरंगाबाद, नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई या भागात 40 हजार कोटी रुपये गुंतवणूकीच्या विशाल प्रकल्पांना उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
यामुळे राज्यात सुमारे 1 लाख 20 हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यामध्ये पुणे आणि औरंगाबाद येथे देशातील पहिल्या सुमारे 12 हजार 482 कोटीच्या इलेक्ट्रिक व्हेईकल आणि बॅटरी निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. नवी मुंबईच्या महापे येथे होणाऱ्या जेम्स अॅण्ड ज्वेलरी पार्क प्रकल्पाला अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची पाचवी बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनोज सौनिक आदी अधिकारी उपस्थित होते.
पुणे, औरंगाबाद येथे गोगोरो इंडिया प्रा. लि. कंपनीमार्फत इलेक्ट्रीक व्हेईकल व बॅटरी निर्मिती तसेच स्वॅपिंग स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी करण्यात येणार आहे. हा देशातील पहिला प्रकल्प ठरणार असून त्यास अतिविशाल प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे. गोगोरो संपूर्ण महाराष्ट्रात आगामी काळात सुमारे 12 हजार बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स स्थापन करणार आहे. त्यामुळे राज्यात इलेक्ट्रीक व्हेईकल पायाभूत सुविधा आणि ईव्हीकलच्या वापराला चालना मिळणार आहे.
औरंगाबाद येथे इलेक्ट्रील व्हेईकल्स व बॅटरीची निर्मिती करणाऱ्या इथर एनर्जी कंपनीद्वारे 865 कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. एथर एनर्जी ही भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांपैकी एक आहे. जी प्रगत आणि कनेक्टेड इलेक्ट्रिक दुचाकी बनवते. या प्रकल्पामुळे राज्यामध्ये पुरवठादार इको सिस्टीम स्थापन होण्यास मदत होणार आहे.
तसेच पुणे येथे देशातील पहिल्या ई-बस निर्मितीच्या 776 कोटी गुंतवणूकीच्या पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स प्रा. लि. या घटकाच्या विशाल प्रकल्पास मान्यता देण्यात आली. पुणे येथे पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स या घटकाकडून भारतातील सर्वात प्रगत तांत्रिकदृष्ट्या प्रगत व्यावसायिक इलेक्ट्रिक आणि सदर हायड्रोजन इंधन-सेल वाहन निर्मिती सुविधा उभारण्यात येणार आहे. ईलेक्ट्रीक व्हेईकल आणि नवीन ऊर्जेवरील वाहने पुढील दशकात देशातील उत्पादन उद्योगात सर्वात मोठे योगदान देणार आहे. घटकामार्फत उभारला जाणारा प्रकल्प पुणे येथे ईलेक्ट्रीक व्हेईकल आणि हायड्रोजन हब बनू शकतो.
रायगड येथे परफॉर्मन्स केमिसर्व कंपनीच्या 2700 कोटी गुंतवणुकीच्या प्रकल्पास 2033 कोटी गुंतवणुकीच्या स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज कंपनीचा प्रकल्प रायगड येथे, जनरल पॉलिफिल्मस कंपनीचा 500 कोटी गुंतवणूकीचा प्रकल्प नंदूरबार येथे, विप्रो परी रोबोटिक्स कंपनीचा 544 कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प सातारा येथे तर 110 कोटी गुंतवणुकीचा गणराज इस्पात कंपनीचा प्रकल्प अहमदनगर येथे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
जेम्स अँड ज्वेलरी आर्ट प्रमोशन कॉन्सिलद्वारे (GJEPC) नवी मुंबई येथील महापे येथे स्थापित होणाऱ्या इंडिया जेम्स अॅन्ड ज्वेलरी पार्क प्रकल्पाला अतिविशाल प्रकल्प म्हणून दर्जा देण्यात आला. सुमारे 21 एकर जागेवर इंडिया ज्वेलरी पार्क होणार आहे. 1354 औद्योगिक व व्यापारी आस्थापना याठिकाणी सुरू होतील.
महाराष्ट्रात रत्ने व आभूषणे क्षेत्रातील घटकांसाठी एकात्मिक सुविधा विकसित करण्यासाठी तसेच गुंतवणूक, उत्पादन, रोजगार, व्यापार आणि निर्यात यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एकूण रु. 20 हजार कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सुमारे 1 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. जागतिक स्तरावर जेम्स अॅण्ड ज्वेलरी उत्पादनांची निर्यात वाढण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून प्रस्तावित इंडिया ज्वेलरी पार्क प्रकल्पांतर्गत जोड प्रकल्प म्हणून वेगाने विकसित होत असलेल्या लॅब ग्रोन डायमंड उद्योगावर विशेष भर देण्यात येणार आहे. त्याद्वारे मेगा पार्क फॉर लॅब ग्रोन डायमंडस विकसित करण्याचे नियोजन आहे.
बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, उद्योग विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते.