तक्रारकर्ता शेतकरीच ठरला वीज प्रवाहाचा बळी…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- शेतातील विद्युत खांबात वीज प्रवाह संचारला आहे. तातडीने दुरुस्त करा, नाही तर एखाद्याचा बळी जाईल, अशी सूचना एका शेतकऱ्याने वीज कंपनीकडे केली होती. वारवार सांगूनही कंपनीने याकडे दुर्लक्ष केले होते.
अखेर तेच घडले. तक्रारकर्त्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२६) रोजी टाकळी (ता. राळेगाव) येथे घडली. विठ्ठल संभाजी कुळसंगे (वय ७५) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबबातची माहिती अशी की, विठ्ठल कुळसंगे यांनी आपल्या शेतातील विद्युत खांबात वीज प्रवाह संचारल्याची माहिती चार दिवसाआधी विद्युत कंपनीच्या कर्मचाऱ्याला दिली होती. कर्मचाऱ्याने या तक्रारीकडे दुर्लक्ष करत करूयातअशी उत्तरे दिली. दरम्यान विठ्ठल हे शेतातील काडीकचरा वेचण्याचे काम करीत होते. शेतात पावसामुळे सर्वत्र पाण्याचा ओलावा पसरलेला होता. खांबापासून काही अंतरावर काम करीत असताना विजेचा धक्का बसून विठ्ठल दूर फेकले गेले.
या घटनेनंतर तातडीने त्यांना वडकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर विद्युत कंपनीच्या कारभाराविषयी रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.