देवेंद्र फडणवीसांचाही खोचक प्रश्न ; “कोण संजय राऊत…?”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावात जाऊन बेळगाव एकीकरण समितीचा प्रचार केला पाहिजे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता कोण संजय राऊत?
असा खोचक प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी कोण संजय राऊत? असं विचारलं होतं. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही असाच प्रश्न विचारला आहे.
काय विचारला गेला प्रश्न? काय म्हणाले फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावमध्ये जाऊन आपण महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करावा असं आवाहन संजय राऊत यांनी केलं. त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कोण संजय राऊत? ते काय राष्ट्रीय नेते आहेत का? कोण आहेत ते?” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या आवाहनाला उत्तर दिलेलं नाही. उलट प्रतिप्रश्न विचारला आहे की कोण संजय राऊत?
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून भाजपात जाण्याच्या चर्चेवरून खुलासा केल्यानंतरही खासदार संजय राऊत यांच्याकडून अजित पवार यांच्याबाबत वक्तव्ये केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनी कोण संजय राऊत? असा प्रतिप्रश्न केला होता. चारच दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. तेव्हा अजित पवार म्हणाले होते की माझ्याबाबत पसरविण्यात आलेल्या बातम्यांबाबत मी बोललो आहे. त्यात कोणाचेही नाव घेतलेले नाही, मी आणि माझा पक्ष याबाबत बोललो. त्यामुळे कोणाला लागायचे काहीच कारण नाही. कोण संजय राऊत? असा सवाल करत मी बोलताना कोणाचे नाव घेतलेले नव्हते. तरीदेखील काहीजण अंगावर ओढवून घेतात असंही अजित पवारांनी म्हटलं होतं.
फडणवीसांना गोड माणूस म्हणणार का संजय राऊत?
जेव्हा अजित पवारांनी खोचक प्रश्न विचारला की कोण संजय राऊत त्याबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी उत्तर दिलं की अजित पवार हे स्वीट डिश आहेत. गोड माणूस आहेत माझ्यात आणि त्यांच्यात काहीच वाद नाही. आता त्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांनाही गोड माणूस असं संजय राऊत म्हणणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.