“शिवसेना खरी आहे हे सांगायला पाकिस्तानचं सर्टिफिकेट लागतं हे देशाचं..” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- खरी शिवसेना कोणती हे जाणून घ्यायचं असेल तर पाकिस्तानला विचारा, पाकिस्तानही सांगेल. मात्र निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झाला आहे त्यामुळे त्यांना ते दिसत नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली.
त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. खरी शिवसेना कुणाची हे सांगायला पाकिस्तानचं सर्टिफिकेट लागतं हे दुर्दैव आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
इथे जमलेली गर्दी पाहून खरी शिवसेना कुणाची? हे दिसतंय ना? हे कळतं आहे ना? पाकिस्तानला विचारलं की शिवसेना कुणाची तर पाकिस्तानही सांगेल. पण आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयुक्ताला कळत नाही. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पाचोऱ्यातल्या सभेत टीका केली होती. ठीक आहे तो त्यांचा दोष आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय दिलं उत्तर?
कुणीतरी सांगितलं की खरी शिवसेना काय आहे ? हे पाकिस्तानला विचारलं तरीही ते सांगतील. असं भाष्य केलं गेलं आहे. हे महाराष्ट्राचं आणि देशाचं दुर्दैव आहे. कारण तुम्हाला तुमची शिवसेना खरी की खोटी हे सांगायला पाकिस्तानचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं? असा प्रश्न विचारत एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
जळगावातल्या पाचोरा या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा रविवारी पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील यांच्यासह भाजपाचा समाचार घेतला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. या सभेवरून आता प्रत्युत्तरं दिली जात आहेत. उद्धव ठाकरेंनी जे वक्तव्य केलं त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.