आतासुद्धा मुख्यमंत्री होण्यास आवडेल : अजित पवारांच्या ‘गुगली’ने पुन्हा चर्चेला उधाण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- आतासुद्धा बहुमत मिळाल्यास राज्याचा मुख्यमंत्री होण्यास आवडेल, असा पुनरूच्चार राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी अजित पवार १४५ चा बहुमताचा आकडा कोठून आणणार?
असा खोचक सवाल केला होता. यावर आज (दि. २३) माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्यामध्ये मागील चार दिवसांपासून कलगीतुरा रंगला आहे. संजय राऊत यांनी अजित पवार यांचा स्वभाव गोड आहे, आम्ही दोघांनी एका टेबलवर जेवण केल्याचे विधान केले होते. यावर संजय राऊत यांच्याशी माझी भेट झाली नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले होते.
खारघर दुर्घटनेत १३ लोकांचा उष्माघाताचा त्रास होऊन मृत्यू झाला आहे. काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यावर बोलताना पवार यांनी या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी केली. प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार आहे, असेही पवार म्हणाले.