भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार १०-१५ आमदार घेऊन भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. इतकंच नाही, तर अजित पवारांनी त्यांच्या समर्थक आमदारांची बैठक बोलावल्याचे वृत्तही प्रकाशित झाले.
यानंतर आता अखेर अजित पवारांनी या आमदारांच्या बैठकीच्या वृत्तावर भूमिका स्पष्ट केली. तसेच सोमवारच्या दिवसभरातील नियोजित कार्यक्रमावरही भाष्य केलं.
अजित पवार म्हणाले, “खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना आणि उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे.”
“मंगळवारी (१८ एप्रिल) मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार आहे. तेथे कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्यापूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी,” असा खुलासा अजित पवार यांनी केला.