स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी…? ठाकरे गटाच्या खासदारांचा मोठा निर्णय….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी होणार का? असं चित्र निर्माण झालं आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी काल मालेगावातील भाषणातून राहुल गांधींना चांगलच ठणकावलं होतं.
सावरकर आमचे दैवत आहेत, त्यांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना दिला होता. त्यानंतर आज ठाकरे गटाच्या खासदारांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या डिनर पार्टीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी आज म्हणजे २७ मार्चला संध्याकाळी सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांना त्यांच्या घरी डिनरसाठी आमंत्रित केलं आहे. मात्र या डिनर पार्टीला ठाकरे गटाचे खासदार उपस्थित राहणार नसल्याची माहिती ठाकरे खासदार संजय राऊत यांनी दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचा एकही खासदार या डिनर पार्टीला उपस्थित राहणार नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे म्हणाले की, सावरकर आमचं दैवत आहेत. आमच्या दैवतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. सावरकरांनी जे केलं येड्यागबाळ्याचं काम नाही. ज्या सावरकरांनी 14 वर्षे अनन्वित छळ सोसला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपण लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. मात्र आपल्याला तोडण्याचं काम केलं जातंय. त्यासाठी आपल्याला डिवचलं जात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.