राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर विश्वास, भाजपचे दार खुलेच…! चंद्रशेखर बावनकुळे यांचे सूचक वक्तव्य….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहेच, त्यांचा भाजपवर आणखी विश्वास वाढेल, आमचे दार खुलेच आहे, असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी येथे केले.
भाजपमध्ये गद्दारांना नव्हे तर, इमानदारांना थारा आहे.राज ठाकरे हे प्रगल्भ नेते असून खुलेपणाने बोलतात. मनात एक आणि ओठावर एक असे त्यांचे नसते, असे कौतुकही त्यांनी केले.
भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी बैठकीतून मिळालेल्या ऊर्जेचा उपयोग बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर ताकद उभी करण्यात होईल, असे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयातून २०० हून अधिक जागा जिंकू असा दावा त्यांनी केला.
अमरावतीत झालेल्या पराभवाचे चिंतन करण्याची गरज आहे. समाज माध्यमांचा गैरवापर केला जात आहे. काही लोकांनी पेड वॉररूम तयार केल्या आहेत. त्याला उत्तर देण्यासाठी १८ हजार कार्यकर्त्यांची फौज उभी करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
ठाकरे गटावर टीका
सावरकर यांच्यावर टीका केली जात असताना उद्धव ठाकरे गप्प होते. हिंदूुत्ववादी मते कधीही त्यांना मिळणार नाहीत. ठाकरे गट पुढील काळात ‘एमआयएम’शीही युती करेल, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.