खोऱ्यानं खा, कधी खोक्यानं खा, शिंदेंनी खा….. विरोधकांचे टाळ घेऊन अनोखं आंदोलन…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- हिळावी अधिवेशनाचा पहिला आठवडा संपला असून सोमवारपासून शेवटच्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. शेवटच्या टप्प्यात विरोधक आक्रमक झाले असून आता उद्धव ठाकरेही मैदानात उतरले आहेत.
आजच्या दिवशी मंत्री अब्दुल सत्तार, संजय राठोड आणि सीमावाद प्रकरण चांगलं तापणार असल्याचे दिसत आहे. विरोधकांचं आज वेगळं रूप विधान भवनाच्या परिसरात पाहायला मिळाले. टाळ वाजवत भजन म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
विरोधकांचे भजनातून सत्ताधाऱ्यांवर हल्ला खोऱ्याने खा, कधी खोक्याने खा, भूखंड खा, कोणी गायरान खा.. शिंदेंनी खा कधी, सत्तांरांनी खा.. असं भजन म्हणत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केल्याचं पाहायला मिळाले. सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरे टार्गेट होत असल्यामुळे आता उद्धव ठाकरेही मैदानात उतरत आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या सुरूवातीलाही उद्धव ठाकरे नागपूरमध्ये आले होते, यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकासआघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठीची रणनीती आखण्यात आली. या बैठकीनंतरच नागपूर भूखंड प्रकरणात विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी कृषीमंत्री अद्बुल सत्तार जमीन घोटाळाच्या वादात असतानाच आता आणखी एका नेत्याचे नाव समोर आले आहे.
संजय राठोड हे मविआ सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी 29 जुलै 2019 रोजी गायरानाची पाच एकर जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश काढले होते, अशी बाब आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महसूल राज्यमंत्री म्हणून या प्रकरणाची सुनावणी राठोड यांच्याकडे झाली होती. सावरगाव (ता. मंगरुळपीर, जि.
वाशिम) येथील गायरान जमिनीचे हे प्रकरण आहे. शासकीय इ-क्लास गायरान जमिनीवरील अतिक्रमण हे नियमानुकूल करण्याची कुठलीही तरतूद नियमात नाही. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी तसे आदेश दिलेले आहेत, असे नमूद करून वाशिमच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मंगरुळपीरच्या तत्कालीन तहसीलदारांनी ही जमीन खासगी व्यक्तीला देता येणार नाही, असे लेखी आदेश दिलेले होते. शांताबाई जाधव यांच्या अर्जावर या दोघांनी हा शेरा दिला होता.
कृषिमंत्री सत्तारांचा गायरान जमिनीचा घोळ महसूल राज्यमंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी वाशीम जिल्ह्यातील 150 कोटी रुपये किमतीची गायरान जमीन एका खासगी व्यक्तीला बेकायदा बहाल केल्याचा आरोप आहे. वाशीम जिल्ह्यातील मौजे घोडबाभूळ येथील सरकारी गायरान जमीन गट नंबर 44 मधील 37 एकर 19 गुंठे जमिनीचा हा घोटाळा आहे. हा घोटाळा 150 कोटींचा आहे. गायरान जमीन कुणाला देता येत नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. असे असताना, योगेश खंडारे यांनी गायरान जमिनीसाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. सरकारी गायरान जमीन हडप करण्याचा डाव असल्याचे निरीक्षण नोंदवत जिल्हा न्यायालयाने ही मागणी फेटाळली.